८ पदरी द्रुतगती महामार्गामुळे वाचणार प्रवासाचा वेळ (फोटाो - istockphoto)
पुणे: पुणे – बंगळुरू दरम्यानचा ८ पदरी द्रुतगती महामार्ग ५० हजार कोटींपेक्षा जास्त खर्च करून बांधला जाणार आहे. या द्रुतगती महामार्गामुळे दोन्ही शहरांमध्ये सध्याचा प्रवास वेळ १५ तासांवरून फक्त ७ तासांवर येईल. मुंबई ते बंगळुरु प्रवासाचे अंतर सुध्दा त्यामुळे घटेल.७०० किमी लांबीचा हा ग्रीनफील्ड एक्सप्रेस वे केंद्र सरकारच्या भारतमाला परियोजनेच्या दुसऱ्या टप्प्याअंतर्गत विकसित केला जात आहे. तो कर्नाटकातील नऊ जिल्हे व महाराष्ट्रातील तीन जिल्ह्यांशी जोडला जाईल.
पुणे-बंगळुरू एक्सप्रेस वे हा भारतमाला परियोजनेअंतर्गत विकसित केला जाईल आणि राष्ट्रीय महामार्ग एन एच-४८ च्या (जुना एन एच-४) तुलनेत हा एक पर्यायी आणि जलद मार्ग म्हणून काम करेल. उत्तरेकडील टोकावर, एक्सप्रेसवे ‘एमएसआरडीसी’च्या पुणे रिंग रोड प्रकल्पापासून तो सुरू होईल. भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण, ‘एनएचआयआय’या महत्त्वाकांक्षी महामार्गाचा सविस्तर प्रकल्प अहवाल (डीपीआर) करत आहे. नंतर भूसंपादनाची प्रक्रिया सुरू होईल.
हा द्रुतगती मार्ग कर्नाटकातील नऊ जिल्ह्यांमधून जाईल, ज्यात बेंगळुरू ग्रामीण, तुमकूर, चित्रदुर्ग, दावणगेरे, विजयनगर, कोप्पल, गदग, बागलकोट आणि बेळगाव यांचा समावेश आहे . महाराष्ट्रात तो सांगली, सातारा आणि पुणे ग्रामीण व शहर क्षेत्रात असेल.सुरळीत वाहतूकीसाठी हा एक्सप्रेस वे ८ पदरी महामार्ग म्हणून नियोजित आहे. बांधकामाचा अंदाजे खर्च ५० हजार कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे. या एक्सप्रेसवेमध्ये सहा रोड ओव्हर ब्रिज , २२ इंटरचेंज, ५५ फ्लायओव्हर आणि राष्ट्रीय आणि राज्य महामार्गांसाठी १४ क्रॉसिंग असतील. वाहनांना ताशी १२० किमी वेगाने प्रवास करण्याची परवानगी असेल.
हा एक्सप्रेस वे कर्नाटकातील अविकसित प्रदेश आणि महाराष्ट्रातील दुष्काळग्रस्त भागातून जाईल, ज्यामुळे रहिवाशांना चांगली्य कनेक्टिव्हिटी आणि व्यापाराच्या संधींचा फायदा होईल. पुणे-बेंगळुरू एक्सप्रेसवे जवळच्या भागातील निवासी आणि व्यावसायिक रिअल इस्टेट बाजारपेठांमध्ये सुधारित कनेक्टिव्हिटी आणि संबंधित पायाभूत सुविधांसह परिवर्तन घडवून आणण्यासाठी सज्ज असेल.
एक्सप्रेसवेमुळे पुणे व बंगळूरू या दोन्ही शहरांमधील प्रवासाचे अंतर अंदाजे ९५ किलोमीटरने कमी होईल. सध्या, वाहतूक व्यवस्थेनुसार १५ तास लागू शकतात. ‘पुणे-बेंगळुरु एक्सप्रेस वे’ साठी प्राथमिक काम सुरू असून तो २०२८ पर्यंत पूर्ण करण्यासाठी नियोजन आहे. या महामार्गावरील प्रदेशात आर्थिक विकासाला चालना अशी अपेक्षा आहे.
राज्यातील ३ जिल्ह्यातून जाणार
महाराष्ट्रातील पुणे, सातारा, सांगली जिल्ह्यांसह कर्नाटकातील बोम्मनल (अथणी तालुका), बेळगावी जमखंडी, बागलकोट, बदामी, मुधोळ, नरगुंद, गदग (रॉन), येलाबुर्गा (कोप्पल), विजयनगरा (कुडलिगी), दावणगेरे (जगालुरू), मधुगिरी, चित्रदुर्ग तालुका, बंगळुरू, कोकुरुलम, चित्रदुर्ग तालुका, कोरमरांग, कोमलम (दोड्डबेल्लापूर) या गावातून हा प्रस्तावित महामार्ग जाईल.