chandrakant patil- amol mitkar
पुणे : पुण्यातील ड्रग्ज प्रकणावरून विरोधकांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. काँग्रेस आमदार रवींद्र धंगेकर आणि शिवसेना नेत्या सुषमा अंधारे यांनी रान उठवले आहे. या प्रकरणात त्यांनी थेट उत्पादन शुल्क खात्याच्या मंत्र्यांवर आणि अधिकाऱ्यांवर गंभीर आरोपही केले. या प्रकरणामुळे राज्य सरकारच्या अडचणी वाढणार असल्याचे दिसत आहे.
त्यातच ड्रग्ज प्रकरणावरून महायुतीत वादाची ठिणगी पडली आहे.पुण्यातील ड्रग्ज प्रकरणावरून पुण्याचे माजी पालकमंत्री चंद्रकांत पाटील आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांची राष्ट्रवादीतील मतभेद चव्हाट्यावर आले आहेत. त्याचे झाले असे की, चंद्रकांत पाटील यांनी ड्रग्ज प्रकरणावरून माध्यमांनी विचारले असता पुण्यातील ड्रग्ज प्रकरणावरून चंद्रकांत पाटील यांना विचारले असता, मी पुण्याचा पालकमंत्री असताना पुण्यात अशा घटना घडल्याच नाहीत, अशी प्रतिक्रीया दिली. पण त्यांच्या या प्रतिक्रीयेनंतर अजित पवार गटाचे प्रवक्ते अमोल मिटकरी यांनी चंद्रकात पाटलांना सुनावले आहे.
चंद्रकांत पाटील यांच्या प्रतिक्रीयेवर मिटकरींनी ट्विट करत पलटवार केला आहे. “चंद्रकांत दादा पुण्याचे पालकमंत्री असताना ड्रग्जसासारख्या चिंताजनक घटना घडल्या नाहीत कारण त्यांच्या आशीर्वादाने हे सर्व काही पुण्यात व्यवस्थित सुरू होते. अजितदादा पालकमंत्री झाल्यामुळे ह्या सर्व चिंताजनक घटना आज उघड झाल्या म्हणुन चंद्रकांत दादा व्यथीत आहेत, असा टोला मिटकरींनी लगावला आहे.
तर दुसरीकडे, मिटकरींच्या या वक्तव्यावर भाजपचे नेते प्रवीण दरेकर यांनी नाराजी व्यक्त करत मिटकरी यांनी तोंडाला आवर घालण्याची गरज असल्याचे म्हटले आहे. तसेच, महायुतीला तडा जाईल, असे वक्तव्य त्यांनी करु नये. आपण एखादी गोष्ट बोलून जाता, पण ती महायुतीसाठी हानीकारक ठरू शकते. त्यामुळे पक्षानेही त्यांना समज देण्याची गरज आहे. अशी प्रतिक्रीया दिली.
या सर्व प्रकारामुळे चंद्रकांत पाटील आणि राष्ट्रवादीत अजूनही पुण्यातील पालकमंत्री पदावरून कोल्डवॉर सुरू असल्याची चर्चा सुरू झाली आहे. अजित पवार भाजप आणि शिंदे गटासोबत सत्तेत सामील झाल्यानंतर अजित पवार यांच्याकडे पुण्याचे पालकमंत्रीपद देण्यात आले. तोपर्यंत चंद्रकांत पाटील यांच्याकडे पुण्याचे पालकमंत्रीपद होते. अजित पवार पुण्याचे पालकमंत्रीपद मिळण्यासाठी आग्रही होते. तर चंद्राकातं पाटलांना हे पद सोडण्याची इच्छा नव्हती. पण अजित पवार सत्तेत आल्यानंतर नाईलाजाने त्यांना पुण्याचे पालकमंत्रीपद सोडावे लागले.