Chandrapur News: गावातच रोजगार, स्थलांतराला आळा! सामूहिक वनहक्कासाठी ब्रह्मपुरीतील २६ ग्रामसभांची एकजूट
‘राधा ऑर्गनायझेशन’च्या समन्वयातून झालेल्या या भेटीत संस्थेचे अध्यक्ष डॉ. हरिदास तुपटे यांनी २६ ग्रामसभांचे प्रतिनिधित्व करत ग्रामस्थांच्या विविध समस्या, मागण्या तसेच सीएफआर कामांमधील प्रशासकीय अडचणी प्रकल्प अधिकाऱ्यांसमोर मांडल्या. प्रलंबित कामे तातडीने मार्गी लावून ग्रामसभांना आवश्यक प्रशासकीय सहकार्य मिळावे, अशी मागणी यावेळी करण्यात आली. (फोटो सौजन्य – AI Created)
कंवर्जन्स बैठकीकडे लक्ष बैठकीत सीएफआर कामांची सद्यस्थिती, प्रलंबित कामे, रोजगाराच्या संधी आणि ग्रामसभांना भेडसावणाऱ्या प्रशासकीय अडचणी याबाबत सविस्तर चर्चा झाली. प्रकल्प अधिकारी कुमरे यांनी ग्रामसभांच्या प्रतिनिधींचे म्हणणे जाणून घेत संबंधित प्रश्नांवर चर्चा केली. या प्रश्नांचा आगामी कंवर्जन्स बैठकीत आढावा घेऊन आवश्यक ती कार्यवाही करण्याचे आश्वासन प्रकल्प अधिकाऱ्यांनी दिले. त्यामुळे प्रलंबित प्रश्नांना आता गती मिळेल, अशी अपेक्षा ग्रामसभा प्रतिनिधींनी व्यक्त केली.
सामूहिक वनहक्क उपक्रमामुळे गावपातळीवर रोजगाराच्या संधी निर्माण झाल्याने अनेक कुटुंबांना त्याचा थेट आर्थिक लाभ होत असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. पिकांच्या हंगामात रोजगाराच्या शोधात तेलंगणा, कर्नाटक तसेच इतर भागात होणारे स्थलांतर सीएफआरअंतर्गत उपलब्ध झालेल्या रोजगारामुळे कमी होत असल्याचे त्यांनी नमूद केले. राधा ऑर्गनायझेशनच्या सहकार्याने अनेक कुटुंबांना गावातच नियमित रोजगार उपलब्ध झाल्याने त्यांच्या उत्पन्नात वाढ होऊन आर्थिक स्थैर्य निर्माण होत आहे. ‘गावातच रोजगार उपलब्ध झाला, तर स्थलांतराची गरज भासत नाही,’ अशी भावना ग्रामस्थांनी व्यक्त केली.
लातूर शहर विधानसभेची प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध; ‘या’ तारखेपर्यंत दावे-हरकती दाखल करता येणार
स्थानिक वनसंपत्तीचे शाश्वत व्यवस्थापन, रोजगारनिर्मिती आणि ग्रामीण अर्थव्यवस्था मजबूत करण्यासाठी ग्रामसभा सक्षम होणे आवश्यक आहे. याच उद्देशाने २६ ग्रामसभांनी एकत्रितपणे प्रशासनाकडे पाठपुरावा केल्याने सीएफआर उपक्रमांना नवी दिशा मिळण्याची अपेक्षा आहे. ग्रामसभांच्या या प्रयत्नांना राधा ऑर्गनायझेशनकडून सातत्याने मार्गदर्शन व समन्वय मिळत असून, वनहक्काच्या माध्यमातून ग्रामस्थांना आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी करण्यासाठी संस्था प्रयत्नशील असल्याचे यावेळी सांगण्यात आले.






