
Chandrapur News: तीन वर्षांपासून पाइपलाइन तयार, तरी शेतकऱ्यांच्या शेतात पाणी नाही; धानपिकांचे नुकसान होण्याची भीती
सावली तालुक्यातील शेतीला सिंचनाची सुविधा मिळावी आणि पावसाच्या अनिश्चिततेमुळे होणारे नुकसान टाळता यावे, या उद्देशाने गोसीखुर्द-आसोलामेंढा पाठबंधारे विभागाच्या माध्यमातून विविध भागांत पाइपलाइन टाकण्याचे काम करण्यात आले. या योजनेमुळे पावसाअभावी निर्माण होणाऱ्या परिस्थितीत शेतकऱ्यांना दिलासा मिळेल, अशी अपेक्षा होती. मात्र, कापसी-पेठगाव परिसरातील भान्सी व वाढोली चक येथील शेतकऱ्यांची ही अपेक्षा अद्याप पूर्ण झालेली नाही. ३ वर्षांपूर्वी पाइपलाइन टाकूनही पाणीपुरवठा सुरू न झाल्याने या योजनेचा नेमका उपयोग काय, असा सवाल शेतकरी उपस्थित करीत आहेत.
सध्या धानपीक वाढीच्या महत्त्वाच्या टप्प्यात असताना पाण्याअभावी पिकांचे नुकसान होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. आधीच पावसाच्या अनिश्चिततेचा सामना करणाऱ्या शेतकऱ्यांना सिंचनाची सुविधा उपलब्ध असूनही तिचा लाभ मिळत नसल्याने आर्थिक संकटाची चिंता सतावत आहे. भान्सी परिसरातील शेतीसाठी उपलब्ध करून देण्यात येणारे पाणी पेठगाव परिसराकडे वळविले जात असल्याचा आरोप स्थानिक शेतकऱ्यांनी केला आहे. त्यामुळे भान्सी व वाढोली चक येथील शेतकऱ्यांना त्यांच्या हक्काच्या सिंचन सुविधेपासून वंचित राहावे लागत असल्याची भावना परिसरात व्यक्त होत आहे. या आरोपांमुळे पाठबंधारे विभागाच्या नियोजनावर आणि पाणीवाटपाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले.
3 वर्षांपासून पाइपलाइन टाकण्यात आलेली आहे. मात्र, यातून अद्याप पाणीपुरवठा सुरू करण्यात आलेला नाही. याबाबत अनेकदा संबंधित विभागाच्या कर्मचारी, अधिकाऱ्याऱ्यांशी विचारणा केली असता याकडे कानाडोळा करण्यात आला, भान्सी परिसरात होणारा पाणीपुरवठा पेठगावकडे वळविण्यात आलेला आहे. जबरानधारक शेतकऱ्यांना पाणी देण्यात येत आहे. मात्र, सातबाराधारक शेतकरी पाण्यापासून वंचित राहण्याची वेळ आलेली आहे.- संतोष भांडेकर, शेतकरी
पाइपलाइनद्वारे पाणीपुरवठा सुरळीत सुरू होता. मात्र, काही अडचणी असल्यास पाइपलाइन पुरवठ्याच्या ठिकाणी जाऊन चौकशी करावी लागेल. त्यानंतरच संबंधित विषयावर तोडगा काढता येणार. – वैजीनाथ पिसाळ, कनिष्ठ अभियंता, पाटबंधारे विभाग