Chandrapur News: सावलीच्या दहीहंडीला राजकीय रंग! धानोरकरांच्या एका निर्णयाने चर्चांना उधाण; नेमकं काय घडलं?
DSP Cricket : मान्सून लीगमध्ये साई सत्यम आणि मायटी स्टार्सचा डंका; प्रतिस्पर्ध्यांचा उडवला धुव्वा
बोम्मावार यांनी भाजपमध्ये जाहीर प्रवेश केल्यानंतर मागील वर्षभरात सावली तालुक्यात विविध सामाजिक, शैक्षणिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांच्या माध्यमातून आपला राजकीय जनसंपर्क वाढविण्यावर भर दिला आहे. ‘साथ फाऊंडेशन’च्या माध्यमातून आयोजित करण्यात येणाऱ्या दहीहंडीचे हे दुसरे वर्ष असून, त्यांच्या नेतृत्वाला मिळणारा वाढता प्रतिसाद लक्षवेधी ठरत आहे. विशेष म्हणजे, बोम्मावारांचे वाढते राजकीय प्रस्थ लक्षात घेऊन यंदा आ. वडेट्टीवार समर्थित मित्र परिवाराने सावलीत प्रथमच दहीहंडीचे आयोजन केल्याची चर्चा आहे. त्यामुळे दोन्ही कार्यक्रमांकडे राजकीय शक्तिप्रदर्शन म्हणून पाहिले जात आहे. या संपूर्ण राजकीय घडामोडीत सर्वाधिक चर्चा होत आहे ती काँग्रेसच्या खा. धानोरकर यांच्या भूमिकेची. (फोटो सौजन्य – AI Created)
वडेट्टीवार समर्थित दहीहंडीला उपस्थित न राहता खा. धानोरकर या बोम्मावार यांच्या भाजप समर्थित दहीहंडीला उपस्थित राहणार असल्याची चर्चा आहे. यामुळे सावली तालुक्यातील राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चाना उधाण आले आहे. ही केवळ सामाजिक कार्यक्रमातील उपस्थिती आहे की त्यामागे भविष्यातील राजकीय समीकरणांची चाहूल आहे? असा सवाल आता नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. खा. धानोरकर आणि आ. वडेट्टीवार यांच्यातील राजकीय मतभेद जिल्ह्याला नवीन नाहीत. मात्र, वडेट्टीवार समर्थित कार्यक्रमापासून दूर राहून भाजप समर्थित दहीहंडीला खासदारांची उपस्थिती चर्चेचा विषय ठरत आहे.
सावली तालुक्यात कुणबी समाजाची मोठी लोकसंख्या असून, या समाजातील मोठा वर्ग खा. धानोरकर यांच्या समर्थकांमध्ये असल्याची स्थानिक राजकीय चर्चा आहे. हीच मतदारांची ताकद आपल्या राजकीय पाठीशी उभी करण्यासाठी बोम्मावार प्रयत्नशील असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे धानोरकरांची भाजप समर्थित दहीहंडीतील उपस्थिती ही केवळ उत्सवापुरती मर्यादित राहणार की त्यातून काँग्रेसच्या मतदारांमध्ये राजकीय संदेश जाणार? याबाबत नागरिकांमध्ये तर्क-वितर्क सुरू झाले आहेत.
दोन्ही दहीहंडी यशस्वी करण्यासाठी काँग्रेस आणि भाजपचे स्थानिक नेते व कार्यकर्ते जोरदार तयारी करीत आहेत. दोन्ही कार्यक्रम सावलीतील राजकीय वातावरणाची दिशा स्पष्ट करणारे ठरणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. दहीहंडीच्या थरावर थर रचले जात असताना सावलीच्या राजकारणातही नव्या समीकरणांचे थर रचले जात आहेत का? खा. धानोरकरांच्या उपस्थितीचा नेमका राजकीय अर्थ काय? याचे उत्तर येणाऱ्या काळातच स्पष्ट होणार आहे. मात्र, सध्या तरी सावलीच्या राजकीय चौकात ‘धानोरकर कुणाच्या दहीहंडीला आणि का?’ हा प्रश्नच चर्चेचा केंद्रबिंदू ठरला आहे.






