
Chandrapur News: गावाची तहान भागवणाऱ्या योजनेलाच चोरट्यांचा फटका! काजळसर गावाच्या पाणीपुरवठा योजनेतील व्हॉल्व्ह चोरीला
Raigad News: पश्चिम घाटात ऊर्जा प्रकल्प नकोच! मुख्यमंत्री फडणवीसांकडे सुनील गोगटे यांची मोठी मागणी
नेरी जवळील काजळसर ग्रामपंचायतीच्या पाणीपुरवठा योजनेतून संपूर्ण गावाला पाणीपुरवठा केला जातो. या योजनेची पाइपलाइन शेतातून गेली असून, त्यावरील व्हॉल्व्ह चोरीला गेल्याचा प्रकार समोर आला आहे. शेतातील पिकांना पाणी देण्यासाठी व्हॉल्व्ह काढून नेण्यात आले असावेत, असा संशय व्यक्त केला जात आहे. मात्र, या चोरीमागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. गुरुवारी गावातील पाण्याच्या टाकीत पाणी आले नसल्याचे निदर्शनास आले.
बराच वेळ होऊनही टाकी भरत नसल्याने पाणीपुरवठा योजनेची तपासणी करण्यात आली. त्यावेळी पाइपलाइनवरील व्हॉल्व्ह चोरीला गेल्याचे उघडकीस आले. या घटनेनंतर ग्रामपंचायत प्रशासनाने तातडीने चिमूर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. या प्रकरणी तक्रार प्राप्त झाल्यानंतर चिमूरचे पोलिस निरीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक प्रकाश देरकर यांच्या नेतृत्वात मेजर चौधरी आणि पोलिस शिपाई नन्नावरे तपास करीत आहेत.
गावाच्या मूलभूत गरजेशी संबंधित पाणीपुरवठा योजनेतील साहित्य चोरीला जाणे ही गंभीर बाब आहे. पोलिसांनी या प्रकरणाचा सखोल तपास करून अज्ञात चोरट्यांचा तातडीने शोध घ्यावा, चोरीला गेलेले व्हॉल्व्ह परत मिळवावेत आणि दोषींवर कठोर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी काजळसर येथील ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे. तसेच पाणीपुरवठा सुरळीत करण्यासाठी ग्रामपंचायतीने तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी अपेक्षाही व्यक्त होत आहे.
परिसरातील नदी-नाले आणि तलाव कोरडे पडल्याने पाणीटंचाईची परिस्थिती गंभीर बनली आहे. अशा वेळी गावाच्या पाणीपुरवठा योजनेतील साहित्य चोरीला जाणे हा नागरिकांच्या दृष्टीने गंभीर प्रकार आहे. व्हॉल्व्ह चोरीमुळे पाणीपुरवठा विस्कळीत झाल्यास नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करण्याची वेळ येऊ शकते. त्यामुळे ग्रामस्थांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.