
फोटो सौजन्य AI
राज्यातील अनेक भागांत दुष्काळी परिस्थिती निर्माण झाल्याने शेतकरी मोठ्या आर्थिक अडचणीत सापडले आहेत. शेतीचे नुकसान, वाढता उत्पादन खर्च आणि उत्पन्नातील घट यामुळे शेतकऱ्यांसमोर जगण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. अशा परिस्थितीत सरकारकडून शेतकऱ्यांना अवघी पाच हजार रुपयांची मदत दिली जात असल्याचा आरोप अतुल लोंढे यांनी केला. शेतकऱ्यांसाठी पुरेसा निधी उपलब्ध नसल्याचे सांगितले जात असताना इतर कार्यक्रमांवर होणाऱ्या खर्चाबाबत त्यांनी सरकारला जाब विचारला.
Nagpur News : धम्मचक्र प्रवर्तन दिनासाठी नागपूर सज्ज ;पाच दिवस वाहतुकीचे विशेष नियोजन
भाजपच्या नेत्यांकडून आयोजित गरबा कार्यक्रमांवर तब्बल १०० कोटी रुपये खर्च केले जात असल्याचा दावा लोंढे यांनी केला. कंत्राटदारांकडून मिळालेल्या आकडेवारीचा हवाला देत त्यांनी खर्चाचा तपशील मांडला. २४ हजार चौरस फुटांपेक्षा अधिक शामियान्यासाठी ६० लाख रुपये, दोन हजार टन क्षमतेच्या वातानुकूलन यंत्रणेसाठी दररोज सात लाख रुपये, तर ध्वनिव्यवस्था, रोषणाई आणि गायकांसाठी दररोज ५० लाख रुपये खर्च होत असल्याचे त्यांनी सांगितले. भोजन व्यवस्था आणि इतर सजावटीवरही दररोज लाखो रुपये खर्च होत असल्याचा आरोप त्यांनी केला.
Nagpur News : करदात्यांना धाक नाही, विश्वासाचे बळ! जीएसटीचा पाया विस्तारण्यासाठी नवी मोहीम
गरबा किंवा देवीच्या भक्तीला काँग्रेसचा विरोध नसल्याचे स्पष्ट करताना दुष्काळात शेतकरी अडचणीत असताना कोट्यवधींची उधळपट्टी करणे योग्य नसल्याची टीका लोंढे यांनी केली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सण साधेपणाने साजरे करण्याचे आवाहन केले होते. मात्र, त्यांच्याच पक्षातील नेते आणि मंत्री या आवाहनाला हरताळ फासत असल्याचा आरोप त्यांनी केला. भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार आणि आमदार अतुल भातखळकर यांच्या आयोजनावरही त्यांनी प्रश्न उपस्थित केले.
या कथित खर्चाची जबाबदारी निश्चित करून संबंधितांवर कारवाई करणार का, असा सवाल लोंढे यांनी मुख्यमंत्र्यांना केला. तसेच याप्रकरणी संबंधित नेत्यांचे राजीनामे घेण्याची मागणीही त्यांनी केली. गरबा आयोजनासाठी होणाऱ्या खर्चाबाबत सरकारने जनतेसमोर स्पष्ट भूमिका मांडावी, असेही ते म्हणाले.