Raigad News: पश्चिम घाटात ऊर्जा प्रकल्प नकोच! मुख्यमंत्री फडणवीसांकडे सुनील गोगटे यांची मोठी मागणी
पर्यावरण, वन व हवामान बदल मंत्रालयाने २७ जुलै २०२६ रोजी पश्चिम घाट पर्यावरणीय संवेदनशील क्षेत्रासंदर्भात प्रसिद्ध केलेल्या प्रारूप अधिसूचनेचा अभ्यास केला आहे. पश्चिम घाट हा देशाच्या पर्यावरणीय सुरक्षिततेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा, समृद्ध व संवेदनशील प्रदेश आहे. या प्रदेशामध्ये घनदाट जंगले, विविध प्रकारच्या वनस्पती, दुर्मिळ वनौषधी, असंख्य पक्षी, वन्यप्राणी, सरपटणारे प्राणी तसेच स्थानिक व संकटग्रस्त जैवविविधता मोठ्या प्रमाणावर आढळते.
पश्चिम घाट हा अनेक नद्यांच्या उगमाचा प्रदेश असून संपूर्ण पर्यावरणीय संतुलन व जलसुरक्षेसाठी त्याचे संरक्षण अत्यंत आवश्यक आहे. महाराष्ट्रातील रायगड जिल्हा व पुणे जिल्ह्याच्या पश्चिम घाट परिसरात विविध धरण, जलविद्युत व पंप्ड स्टोरेज प्रकल्प प्रस्तावित असून काही प्रकल्पांच्या प्रक्रियेस सुरुवात झालेली आहे. अशा प्रकल्पांमुळे मोठ्या प्रमाणावर जंगलक्षेत्र, नैसर्गिक अधिवास, डोंगररांगा, जलप्रवाह व जैवविविधतेवर परिणाम होण्याची गंभीर शक्यता आहे. (फोटो सौजन्य – AI Created)
पश्चिम घाटात मोठ्या प्रमाणात असलेले वनक्षेत्र व नैसर्गिक अधिवासाचा मोठ्या प्रमाणावर नाश होण्याची शक्यता टोरंट सारख्या विनाशकारी प्रकल्प यांच्यामुळे होऊ शकतो. धरणे, जलाशय, बोगदे, प्रवेशमार्ग, वीजवाहिन्या, सबस्टेशन, पंप्ड स्टोरेज प्रकल्प व इतर पायाभूत सुविधांसाठी मोठ्या प्रमाणावर जंगलतोड होण्याची शक्यता आहे. सातत्याने होणारी बांधकामांमुळे वन्यजीवांच्या नैसर्गिक स्थलांतर मार्गामध्ये अडथळे निर्माण होऊ शकतात.
हायड्रॉलिक पॉवर प्रकल्पामुळे दुर्मिळ वनस्पती आणि वनौषधीच्या नाशाचा धोका निर्माण झाला आहे. पश्चिम घाटातील जंगलांमध्ये अनेक स्थानिक, दुर्मिळ व औषधी वनस्पती आढळतात. टोरंट प्रकल्प होणाऱ्या पेज नदीचे पर्यावरणीय आरोग्य, नदीतील जैवविविधता, मासेमारी, शेती व स्थानिक पाणीपुरवठा यावर त्याचा परिणाम होऊ शकतो. त्यामुळे प्रभावित ग्रामसभा, स्थानिक नागरिक, पर्यावरण तज्ज्ञ, वन्यजीव अभ्यासक व जैवविविधता तज्ज्ञ यांचा अर्थपूर्ण सहभाग घेतल्याशिवाय कोणत्याही मोठ्या प्रकल्पाला अतिम मंजुरी देऊ नये, अशी मागणीही होत आहे.
पश्चिम घाटातील घनदाट जंगले, जैवविविधता, वन्यजीवांचे अधिवास, वनौषधी आणि नैसर्गिक जलप्रणाली कायमस्वरूपी धोक्यात येणार असेल, तर अशा विकासाचा पुनर्विचार करणे आवश्यक आहे. पश्चिम घाट हा केवळ आजच्या पिढीचा नाही, तर भावी पिढवांचा नैसर्गिक वारसा आहे. त्यामुळे रायगड व पुणे जिल्ह्यातील पश्चिम घाट परिसरातील विविध धरण व जलविद्युत प्रकल्पांच्या एकत्रित पर्यावरणीय परिणामांचा सखोल, स्वतंत्र व वैज्ञानिक अभ्यास झाल्यानंतर अशा प्रकल्प यांना मान्यता द्यावी. रायगड व पुणे जिल्ह्यातील पश्चिम घाट परिसरातील सर्व प्रस्तावित धरण, जलविद्युत व पंप्ड स्टोरेज प्रकल्पांचा एकत्रित संचयी पर्यावरणीय परिणाम अभ्यास करण्यात यावा.






