
Abdul Sattar: सिल्लोडमध्ये आमदार अब्दुल सत्तार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम (Photo Credit- X)
आमदार अब्दुल सत्तार यांनी मतदारसंघातील प्रत्येक नागरिकाची समस्या जाणून घेण्यासाठी दर आठवड्याला लोकसंपर्क अभियान सुरू केले आहे. सोमवारी झालेल्या बैठकीदरम्यान घरकुल व महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत कुशल-अकुशल कामे तसेच गाय गोठा, व्ययक्तिक सिंचन विहीर योजनेच्या लाभासाठी काही अधिकारी व कर्मचारी पैसे मागत असल्याचा गंभीर आरोप लाभार्थ्यांनी केला.
योजनांतील तक्रारींवरून पं. स. अधिकाऱ्यांना आ. अब्दुल सत्तार यांचे खडे बोल यावर आ. अब्दुल सत्तार यांनी संबंधित अधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरत अशा प्रकारच्या भ्रष्टाचाराबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली. शासकीय योजनांचा लाभ देताना लाभार्थ्यांची अडवणूक, पिळवणूक किंवा कोणत्याही प्रकारचा भ्रष्टाचार खपवून घेतला जाणार नाही. गोरगरीब नागरिकांचा आशीर्वाद घ्या, शासकीय योजना या त्यांच्यासाठीच आहेत. त्या पूर्णपणे पारदर्शकपणे आणि प्रामाणिकपणे राबवा, अशा शब्दांत त्यांनी अधिका-यांना स्पष्ट इशारा दिला.
यावेळी गटविकास अधिकारी रत्नाकर पगार, सहाय्यक गटविकास अधिकारी आशिष म्हस्के, तसेच जि.प. सिंचन विभागाच्या उपविभागीय अभियंता रुचिका घोगरे, एकात्मिक बाल विकास विभागाचे प्रकल्प अधिकारी शिवाजी वने, पर्यवेक्षिका सुनीता सनान्से, जिल्हा परिषद बांधकाम विभागाचे उपविभागीय अभियंता राजेश राजगुरू, पाणीपुरवठा विभागाचे उपविभागीय अभियंता आप्पासाहेब काटकर, तालुका पशुसंवर्धन व दुग्ध संवर्धन अधिकारी डॉ. विजय चव्हाण, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. नासेर पठाण गटशिक्षणाधिकारी राजेश महाजन तसेच पंचायत समितीतील विविध विभागांचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते. दर सोमवारी सिल्लोड आणि दर शुक्रवारी सोयगाव येथे लोकसंपर्क बैठक नियमित होणार असून, नागरिकांनी अर्ज व आवश्यक कागदपत्रांसह उपस्थित राहून या उपक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन आमदार अब्दुल सत्तार यांनी केले.
सोमवारच्या बैठकीत नागरिकांनी मांडलेल्या सर्व मागण्या व प्रलंबित प्रश्न येत्या सोमवारीपर्यंत शक्य तितक्या मार्गी लावून त्याबाबतचा सविस्तर अहवाल पुढील लोकसंपर्क बैठकीत सादर करावा, असे स्पष्ट निर्देश आमदार अब्दुल सत्तार यांनी सर्व संबंधित अधिकाऱ्यांना दिले.