Jayakwadi Dam Water Project
Sambhajinagar Water Supply : छत्रपती संभाजीनगर शहरातील जायकवाडी धरणातील नवीन पाणीपुरवठा योजनेच्या उद्भव विहिरीत (जॅकवेल) गाळ जाण्याचा धोका असल्याने अॅप्रोच चॅनलच्या कामादरम्यान ही विहीर सुमारे दोन महिने बंद ठेवावी लागणार आहे. या काळात शहराच्या पाणीपुरवठ्यावर परिणाम होऊ नये, यासाठी महापालिकेने पर्यायी जलवाहिनी जोडणीचे नियोजन केले आहे.
पैठण रोडवरील संत एकनाथ साखर कारखान्याजवळ २,५०० मिमी व्यासाच्या मुख्य जलवाहिनीला ९०० मिमीची, तर ९०० मिमीच्या जलवाहिनीला ७०० मिमीची जलवाहिनी जोडण्यात येणार आहे. या कामासाठी १ कोटी २८ लाख ४४ हजार ३३९ रुपयांच्या अंदाजपत्रकाला सर्वसाधारण सभेने मंजुरी दिली.
नवीन पाणीपुरवठा योजनेतून शहराला वाढीव १०० दललि (दशलक्ष लिटर ) पाणी उपलब्ध करून देण्याचे नियोजन आहे. मात्र, जायकवाडी धरणातील मुख्य उद्भव विहिरीपर्यंत पाणी आणण्यासाठी अॅप्रोच चॅनल तयार करणे आवश्यक आहे.
Akola News : विजेचा शून्य वापर, तरीही 850 रुपयांचे आले बिल; बिलाच्या आकारणीवर प्रश्नचिन्ह
यासाठी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडून कॉफर डॅम तोडण्याचे काम हाती घेतले जाणार आहे. हे काम सुरू झाल्यानंतर धरणातील गाळ थेट जॅकवेलमध्ये जाण्याची शक्यता मजीप्राच्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे. त्यामुळे विहिरीतील गाळ काढणे आणि ती पुन्हा कार्यान्वित करण्यासाठी किमान दोन महिने लागू शकतात. दरम्यान, ही परिस्थिती लक्षात घेऊन संत एकनाथ साखर कारखान्याजवळ ९०० मिमी डीआय जलवाहिनी २,५०० मिमी एमएस जलवाहिनीला, तसेच ७०० मिमी सीआय जलवाहिनी ९०० मिमी डीआय जलवाहिनीला जोडण्यात येणार आहे.
जायकवाडी येथील ५६ दललि योजनेच्या पंपहाऊसवर मॅनिफोल्ड पाइप जोडणीसह अन्य कामेही केली जाणार आहेत. महापौर समीर राजूरकर आणि आयुक्त अमोल येडगे यांनी प्रस्तावाला मंजुरी देण्याची विनंती केल्यानंतर सभागृहाने एकमताने अंदाजपत्रक मंजूर केले.
१० जून रोजी जायकवाडी येथील मुख्य उद्भव विहिरीवर मनपा आणि मजीप्राच्या अभियंत्यांची संयुक्त आढावा बैठक झाली होती. त्यात तांत्रिक अडचणींवर उपाय म्हणून कॉफर डॅम तोडून अॅप्रोच चॅनलचे काम सुरू करण्याबाबत चर्चा झाली. मात्र, या कामामुळे जॅकवेल बंद ठेवावी लागल्यास नवीन योजनेतून वाढीव पाणी सलग घेणे शक्य होणार नाही, त्याचा शहराच्या पाणीपुरवठ्यावर परिणाम होण्याची शक्यता आहे.
Ans: जॅकवेल सुमारे दोन महिने बंद ठेवावी लागणार.
Ans: धरणातील गाळ जॅकवेलमध्ये जाण्याचा धोका आहे.
Ans: संत एकनाथ साखर कारखान्याजवळ पर्यायी जलवाहिन्यांची जोडणी करण्याचे नियोजन केले.






