बेलापूर इमारत दुर्घटनेतील आपदग्रस्तांना आवश्यक ती सर्व मदत तातडीने करा, मुख्यमंत्र्यांचे मनपा आयुक्तांना सूचना
नवी मुंबईतील बेलापूरच्या शहाबाज गावात सेक्टर १९ मध्ये ४ मजली इमारत कोसळल्याची दुर्घटना घडली. सुदैवाने या दुर्घटनेत एका रिक्षावाल्याच्या प्रसंगावधामुळे मोठी जीवितहानी टळली. या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे जवान आणि पोलिस घटनास्थळी दाखल झाले होते. चार मजली इमारत ‘इंदिरा निवास’ कोसळल्याची घटना घडली आहे. या इमारतीत ६४ वर्षांचा पुरुष आणि ४५ वर्षांची महिला अडकली होती. या घटनेत दोघेही सुरक्षितपणे बाहेर काढले गेले असून, त्यांना अपोलो रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले आहे. सध्या घटनास्थळी बचाव कार्य सुरु असून, परिसरात सुरक्षा वाढवण्यात आली आहे. मात्र अजून एक व्यक्ती आत मध्ये अडकल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
हे सुद्धा वाचा : सीबीडी बेलापूरमध्ये चार मजली इमारत कोसळली; ढिगाऱ्याखाली अनेक जण अडकले
शहाबाज गाव, सेक्टर 19, बेलापूर येथे एक इमारत कोसळून आज (27 जुलै) पहाटे झालेल्या दुर्घटनेबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सकाळी नवी मुंबई महानगरपालिका आयुक्त यांच्याशी चर्चा करून माहिती घेतली. इमारत दुर्घटनेत सापडलेल्या आपत्तीग्रस्तांना तातडीने आवश्यक ती सर्व मदत उपलब्ध करून देण्यात यावी, अशी सूचना मुख्यमंत्री शिंदे यांनी यावेळी महानगरपालिका आयुक्तांना दिली. मुख्यमंत्री शिंदे हे निती आयोगाच्या बैठकीसाठी सध्या दिल्ली येथे आहेत. बैठकीला जाण्यापूर्वी तेथूनच त्यांनी महानगरपालिका आयुक्त कैलास शिंदे यांच्याशी फोनद्वारे चर्चा करून इमारत दुर्घटनेसंदर्भात माहिती घेतली.
इमारत दुर्घटनेनंतर प्रशासनामार्फत तातडीने बचावकार्य सुरू करण्यात आले आहे. या सर्व आपत्तीग्रस्तांना तातडीचे उपचार, आरोग्य सुविधा, अन्नपाणी, कपडे, तात्पुरता निवारा आदी आवश्यक सर्व सुविधा तातडीने उपलब्ध करून देण्यात याव्यात. महानगरपालिका आणि इतर सर्व संबंधित प्रशासकीय विभागांनी या आपत्तीग्रस्तांना आवश्यक ते सहाय्य तातडीने उपलब्ध करावे, अशा सूचना मुख्यमंत्री शिंदे यांनी दिल्या आहेत.