'विधानसभेला हे शोभणारं नाही, कारवाई झालीच पाहिजे'; विधानभवनातील राड्यानंतर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया
महाराष्ट्र विधानमंडळाच्या परिसरात बुधवारी घडलेली हाणामारीची घटना राज्याच्या राजकीय वातावरणात खळबळ माजवणारी ठरली आहे. विधानभवनाच्या लॉबीत राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार गट) आमदार जितेंद्र आव्हाड आणि भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांच्या समर्थकांमध्ये झालेल्या तुंबळ हाणामारीचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे. या घटनेनंतर तीव्र प्रतिक्रिया उमटत असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे.
‘गुंडांना विधानभवनात पास कोणी दिले?’; कडक कारवाई करा, उद्धव ठाकरेंची मागणी
“ही घटना सभागृहाच्या परिसरात घडली आहे. हा संपूर्ण परिसर विधानसभेचे अध्यक्ष आणि विधान परिषद सभापती यांच्या अधिपत्याखाली येतो. त्यामुळे या प्रकरणाची गंभीर दखल अध्यक्ष आणि सभापतींनी घ्यावी, असं देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलं आहे.“विधानसभेच्या परिसरात जर अशा प्रकारे मोठ्या प्रमाणात लोक जमवून मारामारी केली जात असेल, तर हे निंदनीय आहे आणि या परिसराला शोभणारे नाही. त्यामुळे यावर कारवाई झालीच पाहिजे, असंही त्यांनी म्हटलं आहे.
हाणामारीचा व्हिडिओ समोर आल्यानंतर विरोधी पक्षांनी सरकारवर आणि सुरक्षेवर टीकेची झोड उठवली आहे. विधिमंडळासारख्या संवेदनशील परिसरात कार्यकर्त्यांना प्रवेश कसा मिळाला, त्यांना पास कोणी दिले, यावरही अनेकांनी प्रश्न उपस्थित केले आहेत.
या घटनेवर भाजप आमदार आणि माजी विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनीही “मला या घटनेची कल्पना नव्हती. अशा प्रकारची घटना घडली असेल, तर ती नक्कीच दुर्दैवी आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या प्रकरणाची संपूर्ण माहिती घेतील आणि त्यानंतर आवश्यक ती कारवाई होईल.” असं त्यांनी म्हटलं आहे.
“विधानमंडळात अधिवेशन सुरू असताना कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित राहतात. याआधीही अशा प्रकारचा अनुभव आला आहे. त्यामुळे यावर काहीतरी निर्बंध लावणे आवश्यक आहे. सुरक्षेच्या दृष्टीने सरकार आणि संबंधित यंत्रणांनी याची गंभीर दखल घ्यावी, यासाठी आम्हीही मागणी करणार असल्याचं दरेकर यांनी म्हटलं आहे.
या हाणामारीच्या पार्श्वभूमीवर विरोधकांनी विधानभवनात वाढत असलेल्या असुरक्षेवर चिंता व्यक्त केली आहे. लोकशाहीच्या मंदिरातच जर अशा घटना घडू लागतील, तर त्याचे दूरगामी परिणाम होतील, अशी प्रतिक्रिया अनेक विरोधी नेत्यांनी दिली आहे. या प्रकरणी विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी अहवाल आल्यानंतर योग्य ती कारवाई केली जाईल, असं म्हटलं आहे.