'कुणाला फसवायचं यात भाजप पटाईत'; बच्चू कडूंचा मुख्यमंत्र्यांवर हल्लाबोल
मुंबई : गेल्या काही दिवसांपासून राजकारणात विविध घडामोडी घडत आहेत. सत्ताधारी आणि विरोधकांकडून एकमेकांवर टीकाटिप्पणी केली जात आहे. त्यात आता प्रहार संघटनेचे नेते माजी आमदार बच्चू कडू यांनी भाजपवर निशाणा साधला. ‘कुठलंही सरकार असू दे ते शेतकरी, शेतमजुरांसाठी नाहीच. जो शेतकरी, कष्टकरी, कामकरी आहे, त्याच्यासाठी लढा द्यावाच लागतो. ईडीमध्ये कोणाला कसं फसवायचे? यात लोकांना कसे सत्तेत घ्यायचे? मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजप पटाईत आहे’, अशा शब्दांत त्यांनी टीका केली.
बच्चू कडू यांनी विविध मुद्यांवरून सरकारला धारेवर धरले. ते म्हणाले, ‘केंद्रात आणि राज्यात सत्ता असतानाही देवेंद्र फडणवीसांनी महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी काय केले हे त्यांनी सांगावे? मराठा, ओबीसी, दलित, मुस्लिम, आदिवासी या आरक्षणाला घेऊन गावागावात वाद होता कामा नये. राजकारण बाजूला ठेवायचं आहे. राजकारण जाती-धर्मावर करायचे आणि व्यवस्थित समीकरण जुळवायचे, हे त्यांचे राजकारण सुरू आहे. ईडीमध्ये कोणाला कसं फसवायचे? यात लोकांना कसे सत्तेत घ्यायचे? मुख्यमंत्री फडणवीस आणि भाजप पटाईत आहे. तिथे जे कौशल्य वापरतात ते कौशल्य या आरक्षणाच्या मुद्याला घेऊन का वापरत नाही. त्यात वाद होईल यासाठी का वापरतात’.
तसेच केंद्रात आणि राज्यात तुमची सत्ता आहे. त्यामुळे, ओबीसी आणि मराठ्यांच्या नेत्यांशी बोलावे. यात कुणाचे वाईट होऊ नये, कोणी कोणाचे हक्क हिसकावू नये, ही सगळी व्यवस्था निर्माण करावी, असा हल्लाबोल प्रहार नेते बच्चू कडू यांनी भाजपवर केला.
महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांना मिळत नाही हमीभाव
बच्चू कडू पुढे म्हणाले, महाराष्ट्रात शेतकऱ्यांच्या भावाला हमीभाव मिळत नाही. मात्र, लगतच्या छोट्याशा छत्तीसगड राज्यांमध्ये शेतकऱ्यांच्या मालाला 3100 प्रती क्विंटल हमीभाव मिळतोय आणि महाराष्ट्रात कमी दर मिळतो. छत्तीसगडमध्ये एका एकरात 12 ते 13 हजार रुपये दर देतो तर महाराष्ट्रात हेक्टर मागे 15000 रुपये देतो एवढी मोठी तफावत आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री विदर्भातील असताना सुद्धा इथे तूर, कापूस, भात उत्पादक शेतकरी मरतोय. केंद्रात आणि राज्यात सत्ता असतानाही फडणवीसांनी महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी काय केले, हे त्यांनी सांगावे, असेही ते म्हणाले.