'गुंडांना विधानभवनात पास कोणी दिले?'; कडक कारवाई करा, उद्धव ठाकरेंची मागणी
राज्याच्या विधिमंडळ अधिवेशनादरम्यान आज प्रचंड राडा पहायला मिळालं. विधानसभेच्या लॉबीमध्ये जितेंद्र आव्हाड आणि गोपीचंद पडळकर यांच्या समर्थक एकमेकांना भीडले. त्यानंत तुंबळ हाणामारी झाली असून उद्धव ठाकरेंनी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. अशा गुंडांना विधीमंडळात पास कोणी दिले असा संतप्त सवाल करत, ज्यांनी पास दिलेत त्यांच्यावर कठोर कारवाई झाली पाहिजे, मुख्यमंत्र्यांनी आणि गृहमंत्र्यांनी सर्व कामे सोडून कारवाई करण्याची मागणी केली आहे.
Gopichand Padalkar: विधिमंडळातील राड्यावर पडळकरांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “घडलेली घटना ही…”
नक्की काय म्हणाले उद्धव ठाकरे?
“विधानभवनात येण्यासाठी अशा गुंडांना पास कोणी दिले? हे लोक समर्थक आहेत की गुंड? जर हीच परिस्थिती असेल, तर विधानभवनाला काही अर्थ उरत नाही,” असा थेट सवाल उद्धव ठाकरेंनी केला. यासोबतच, “मुख्यमंत्र्यांनी आणि गृहमंत्र्यांनी सर्व कामं बाजूला ठेवून यावर कठोर कारवाई करावी. पास देणाऱ्यांवरही कारवाई झाली पाहिजे. जर तुम्ही यावर पावले उचलली नाहीत, तर तुम्हाला जनतेला तोंड दाखवण्याचा अधिकार नाही,” अशा शब्दांत त्यांनी संताप व्यक्त केला.
काही दिवसांपूर्वी जितेंद्र आव्हाड यांनी विधानभवनात प्रवेश करताना रेड कार्पेटवर घोषणाबाजी करत गोपीचंद पडळकर यांच्यावर अप्रत्यक्ष टीका केली होती. त्यानंतर वातावरण तापले. बुधवारी पडळकर यांनी आव्हाड यांच्या गाडीच्या दरवाजाला लाथ मारली, ज्यामुळे दरवाजा थेट आव्हाड यांना लागला. यानंतर वादाने गंभीर वळण घेतले आणि आज दोघांचे समर्थक थेट विधानभवनाच्या लॉबित भिडले.
यात शिवीगाळ, धक्काबुक्की आणि दमदाटीच्या घटना समोर आल्या आहेत. हा प्रकार पाहून सुरक्षेच्या दृष्टीने मोठा प्रश्न उपस्थित होतोय. घटनास्थळी सुरक्षा व्यवस्था असूनही अशा प्रकारे वादळ उठणे, यावर प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे.विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी यावर प्रतिक्रिया देताना म्हटलं, “घटनेचा सविस्तर अहवाल आल्यानंतर दोषींवर कारवाई केली जाईल.” उद्धव ठाकरे यांनी मात्र हा प्रकार अतिशय गंभीर मानत “फक्त गुंडांवरच नाही, तर त्यांना विधानभवनात घुसवणाऱ्यांवरही कारवाई झाली पाहिजे,” असा ठाम पवित्रा घेतला आहे.