मुख्यमंत्र्यांनी शब्द पाळला! अहिल्यानगर, श्रीगोंद्यांतील ३२ दुष्काळी गावांसाठी सिंचन प्रकल्पाचा मार्ग खुला
Ahilyanagar Irrigation Project: श्रीगोंदे व अहिल्यानगर तालुक्यात्तील ३२ गावांसाठी महत्त्वपूर्ण असणाऱ्या साकळाई उपसा सिंचन योजनेस आज झालेल्या मंत्रिमंडळाची मान्यता मिळाली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सात वर्षांपूर्वी दिलेला शब्द आता पूर्ण झाला आहे. पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील व भाजप प्रदेश उपाध्यक्ष माजी खा. डॉ. सुजय विखे पाटील यांनी यासाठी सातत्याने पाठपुरावा केला. अहिल्यानगर जिल्ह्यातील नगर व श्रीगोंदे तालुक्यातील ३२ दुष्काळी गावांसाठी असलेल्या या साकळाई योजनेची चर्चा गेल्या अनेक पिढ्यांपासून सुरु होती.
या योजनेतून दोन्ही तालुक्यातील नऊ हजार ६०० हेक्टर क्षेत्राला पाणी देण्याचे नियोजन होते. या योजनेच्या नावाखाली अनेक निवडणुका लढविल्या गेल्या. परंतु प्रत्यक्षात ही योजना पूर्ण झाली नाही. मुख्यमंत्री फडणवीस यांनी १६ एप्रिल २०१९ रोजी वाळकी (ता. नगर) येथे झालेल्या जाहीर सभेत साकळाई योजनेला मंजुरी देण्याचा शब्द दिला होता. त्यानंतर पालकमंत्री असलेल्या राधाकृष्ण विखे पाटील यांनी या योजनेसाठी आपली सर्व ताकद पणाला लावली होती. जलसंपदा मंत्रिपद मिळाल्यानंतर त्यांनी या योजनेच्या कामाचा विशेष पाठपुरावा केला. आता ही योजना एक हजार २३४.१३ कोटी रूपये खर्चुन पुढील चार वर्षात पूर्ण केली जाणार आहे.
राज्यातील ‘लाडक्या बहिणीं’साठी दिलासादायक माहिती; सरकारने घेतला ‘हा’ महत्त्वाचा निर्णय
म्हैसगाव येथे तत्काळ पंपगृह बांधण्यात येणार आहे. यासह इतर तीन पंपगृहही बांधले जाणार आहेत. चार पंपगृह व तीन वितरीकाद्वारे एकूण चार टप्प्यात हे काम पूर्ण केले जाईल. हे पाणी तब्बल २०८.३४ मिटर उपसा करून चिखली व घुटेवाडी येथील डोंगरावरील वितरण हौदात सोडण्याचे नियोजन आहे. प्रकल्पासाठी एकूण ३९.७१ हेक्टर क्षेत्र आवश्यक असून त्यापैकी ३०.२२ हेक्टर खासगी क्षेत्र संपादीत करण्यात येणार आहे.
साकळाई उपसा सिंचन योजनेअंतर्गत म्हैसगाव येथून चार टप्प्यांत पाणी उचलून ते श्रीगोंदे व नगर तालुक्यातील गावांना दिले जाणार आहे. त्यातून लघू पाझर तलाव, पाझर तलाव, सिमेंट नाला बंधारे, गाव तळे भरण्यात येतील. या योजनेसाठी १.६० टीएमसी पाणी सिंचनासाठी व ०.२० टीएमसी पाणी हे पिण्यासाठी देण्याचे नियोजन आहे. खरीप हंगामात १५ जुलै ते १५ ऑक्टोंबर या काळात पाणी उपसा करुन जलसाठ्यांचे पुनर्भरण केले जाणार आहे.
राज्यातील ‘लाडक्या बहिणीं’साठी दिलासादायक माहिती; सरकारने घेतला ‘हा’ महत्त्वाचा निर्णय
ही योजना पूर्ण केली तर ती आम्हीच करू, असे माजी खा. डॉ. सुजय विखे पाटील यांनी अनेकदा ठासून सांगितले. दरम्यान, पालकमंत्री विखे पाटील, स्व. शिवाजीराव कार्डिले, माजी मंत्री बबनराव पाचपुते आणि आमदार विक्रम पाचपुते यांच्या मार्गदर्शनाखाली योजनेला मान्यता मिळाली. प्रस्तावित कार्यक्रमानुसार प्रकल्पाची सर्व कामे चार वर्षांत पूर्ण होतील, असा विश्वास भाजप प्रदेश उपाध्यक्ष डॉ. सुजय विखे पाटील यांनी व्यक्त केला आहे. योजनेस मान्यता दिल्याबद्दल त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व सुनेत्रा पवार, पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचे आभार मानले आहेत.
एकुण खर्चः ११,२३४.१३ कोटी
कालावधीः ४ वर्ष
सिंचन क्षेत्रः ९,६०० हेक्टर
पाणी उपसाः
पाणी वितरणः पाझर तलाव, बंधारे, गाव तळे भरणार






