सौजन्य - नवराष्ट्र टीम
मुंबई : महाराष्ट्राला मन्सूनपूर्व पावसाने झोडपले असून सलग तीन आठवडे पाऊस पडत होता. शेतकऱ्यांच्या मालाचे प्रचंड नुकसान झाले आहे. जनावरांच्या चाऱ्याचाही प्रश्न निर्माण झाला आहे. आधीच संकटात असलेल्या शेतकऱ्याला अवकाळी पावसाने पुन्हा संकटात टाकले आहे. शेतकरी हा अर्थव्यवस्थेचा कणा आहे. या संकटात त्याच्या पाठीशी सरकारने उभे राहिले पाहिजे म्हणून पंचनाम्याचे सोपस्कार बाजूला ठेवून तातडीने हेक्टरी ५० हजार रुपयांची मदत करावी, अशी मागणी काँग्रेस पक्षाची असल्याचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी सांगितले. तसेचं थोरात यांनी सत्यजित तांबेंच्या विधानावरही प्रतिक्रीया दिली आहे
गांधी भवन येथे पत्रकार परिषदेत बोलताना बाळासाहेब थोरात पुढे म्हणाले की, मे महिन्यात काही पीके काढणीला येतात तेव्हाच पावसाने सर्व वाहून नेले, केळी, केसर आंबा फळांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. यात भाजीपाला, टोमॅटो, कांदा, डाळिंब पिकाचेही नुकसान झाले आहे. घऱांची पडझड झाली, काही ठिकाणी पशुधन गेले, पावसामुळे जनावरांच्या चाऱ्याचाही प्रश्न निर्माण झाला आहे, रस्त्यांचे नुकसान झाले आहे, जनावरांच्या गोठ्याचे नुकसान झाले आहे. दुसरीकडे खरिपाची तयारी सुरु असतानाच हे संकट ओढवल्याने आता शेतकऱ्यांकडे पैसे नाहीत, शेतकरी मोडून पडला आहे. पण सरकारची मदत करण्याची मानसिकता दिसत नाही.
एनडीआरएफच्या निकषाने मदत करायची की एसडीआरएफच्या निकषाने ह्यात शेतकऱ्याला काही देणेघेणे नाही, त्यांना भरीव मदत मिळाली पाहिजे. सरकारने ३ हेक्टरचा निकष बदलून २ हेक्टर केला हे आणखी अन्यायकारक आहे. पीक विम्याचे निकष बदलल्याने त्यातूनही फारशी मदत मिळत नाही. सरकारने पंचनामे करण्याचे आदेश दिले पण प्रत्यक्षात प्रशासन काम करताना दिसत नाही. पालकमंत्र्यांनी जिल्ह्याचा दौरा करून आढावा घेतला पाहिजे पण तसे होतानाही दिसत नाही. आज कांद्याला एकरी ६० हजार रुपये खर्च येतो तर टोमॅटोला एकरी ५० हजारांचा खर्च येतो. शेती करणे महाग झाले आहे. सरकारने अशा संकटावेळी शेतकऱ्याला भरीव मदत दिली पाहिजे.
निवडणूक प्रचारावेळी भाजपा युतीच्या नेत्यांनी कर्जमाफी देण्याची घोषणा केली होती पण सत्तेत आल्यानंतर त्यांना त्याचा विसर पडलेला दिसत आहे. काँग्रेस आघाडी सरकार व मविआ सरकार असताना शेतकऱ्याला सातत्याने मदत दिली, कर्जमाफी केली पण आत्ताचे सरकार कर्जमाफीवर बोलत नाही. शेतकऱ्यांमध्ये सरकारविरोधात प्रचंड असंतोष निर्माण झाला आहे. केवळ कोरड्या घोषणा करण्याऐवजी सरकारने कर्जमाफी जाहीर केली पाहिजे, असे थोरात म्हणाले.
सत्यजित तांबेंचे विधान बालीशपणाचे!
विधान परिषदेचे आमदार सत्यजित तांबे यांच्याविषयी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना बाळासाहेब थोरात म्हणाले की, आपल्यासाठी ज्यांनी काही केले त्याचे ऋण ठेवावे. काँग्रेस पक्षाने त्यांना खूप काही दिले आहे. त्यांचे बोलणे बालीशपणाचे होते, त्यांना अजून खूप शिकायचे आहे आणि आत्मचिंतन त्यांनीच करावे असेही थोरात म्हणाले. या पत्रकार परिषदेला महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष प्रशासन व संघटन गणेश पाटील, मुंबई काँग्रेसचे कार्याध्यक्ष व राष्ट्रीय प्रवक्ते चरणजित सिंह सप्रा, प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस रमेश शेट्टी, श्रीरंग बरगे आदी उपस्थित होते.
कृषिमंत्र्यांनी संवेदनशिलपणे बोलावे
कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांच्या वादग्रस्त वक्तव्यावर बोलताना बाळासाहेब थोरात म्हणाले की, शेतकरी संकटात असताना त्याला आधार देण्याची गरज असते, आपण पालक आहोत अशी विधाने करून दुखवू नये, संवेदनशीलपणे वागले पाहिजे. कृषीमंत्री हे पद महत्वाचे आहे, मी स्वतः या विभागाचा मंत्री होतो, शरद पवार केंद्रीय कृषी मंत्री होते पण कोकाटे यांना ती ओसाड गावची पाटीलकी का वाटते हे माहित नाही. कृषी मंत्रालय ओसाड गावची पाटीलकी आहे तर मग बागायती विभाग कोणता हे त्यांनी सांगावे, असा टोलाही थोरात यांनी लगावला.
सत्यजित तांबे काय म्हणाले होते?
काँग्रेस हा देशातील विचार आहे. तो संपणार नाही. राहुल गांधी काँग्रेस नेत्यांनाही सहजासहजी उपलब्ध होत नाहीत. छातीठोकपणे सांगतो की, महाराष्ट्रातील कोणत्याही नेत्यांनी एक तासाच्या आत राहुल गांधींची अपॉइंटमेट घेऊन त्यांना भेटायला जाऊन दाखवावे, असं सत्यजित तांबे म्हणाले होते.