संग्रहित फोटो
बुलढाण्यात पत्रकारांशी बोलताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष म्हणाले की, भाजपाविरोधात काँग्रेसचा मोठा लढा सुरु आहे. काँग्रेसचा विचार संपवण्यासाठी आरएसएसची स्थापना झाली. आज देशात भाजपा व काँग्रेस या दोन भिन्न विचारधारा आहेत, ही जुनी वैचारिक लढाई आहे. मुठभर लोकांनी श्रीमंत व्हावे ही भाजप संघाची भूमिका काँग्रेसला मान्य नाही आणि त्याविरोधात सर्वात मोठं रणशिंग काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पुकारलेले आहे. काँग्रेसचे वैचारिक भांडण भाजपा आणि पुंजीपतीविरोधात आहे. राहुल गांधी यांच्या या लढ्यात इतर पक्षांनीही साथ द्यावी, असे आवाहन करत प्रत्येक पक्षाला स्वतःचे मत असते हे उद्धव ठाकरे यांनीही म्हटले आहे. इंडिया आघाडीत नवा पक्ष येत असला तर त्याची चर्चा राष्ट्रीय पातळीवर होईल त्यासाठी तसा प्रस्ताव असायला हवा पण प्रस्तावच नाही तर त्यावर चर्चा काय करणार, असे हर्षवर्धन सपकाळ म्हणाले.
वंचित बहुजन आघाडीबरोबरच्या आघाडीवर बोलताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष म्हणाले की, आघाडी वा युती करण्याचे अधिकार काँग्रेस पक्षाने स्थानिक पातळीवरील नेत्यांना दिले होते तशीच भूमिका वंचितनेही घेतली होती. त्यानुसार दोन्ही पक्षाच्या जिल्हा स्तरावरील नेत्यांनी चर्चा करून आघाडीबाबतचा निर्णय घेतला पण त्यानंतर चर्चेत काही अडथळा आला असेल तर त्यातून मध्यम मार्ग काढणे शक्य आहे. दोन- दोन अर्ज भरले ते टाळता आलं असते. काँग्रेस व वंचित या दोन पक्षाची आघाडी व्हावी ही दोन्ही पक्षातील कार्यकर्त्यांची भावना आहे आणि आघाडी घोषीत झालेली आहे, ती तोडण्याचा प्रश्नही नाही. आता या परिस्थितीतून पुढे जाण्याच्या अनुशंगाने काँग्रेस सकारात्मक पाऊल टाकेल. संविधानवादी सर्वांनी एकत्र येऊन शिव, शाहु, फुलेंचा लढा पुढे घेऊन जाण्याची आवश्यकता आहे आणि त्यासाठी प्रयत्न करु, असेही हर्षवर्धन सपकाळ म्हणाले.






