कॉंग्रेस नेते नाना पटोले यांनी ऑपरेशन सिंदूर बाबत वादग्रस्त विधान केले (फोटो सोशल मीडिया)
मुंबई : भारताने मागील महिन्यामध्ये पाकिस्तान विरोधात आक्रमक भूमिका घेतली होती. पाकिस्तानमधील दहशतवादावर वचक बसवण्यासाठी भारताने ऑपरेशन सिंदूर केले. याअंतर्गत पाकिस्तान आणि पाकिस्तानव्याप्त काश्मीरमधील दहशतवादी तळांवर हल्ला केला. यावेळी काँग्रेस पक्षाने सरकारसोबत राहण्याची भूमिका घेतली होती. आता मात्र काँग्रेसने नेत्यांनी ऑपरेशन सिंदूरबाबत संशय घेण्यास सुरुवात केली आहे. काँग्रेस नेते नाना पटोले यांनी मोदी सरकारवर निशाणा साधताना ऑपरेशन सिंदूर या लष्करी कारवाईवर संशय व्यक्त केला आहे.
भारतीय सैन्याकडून करण्यात आलेल्या ऑपरेशन सिंदूरवर नाना पटोले यांनी संशय व्यक्त केला आहे. नाना पटोले यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, “ऑपरेशन सिंदूर म्हणजे लहान मुलांचा संगणकावरील व्हिडीओ गेम होता. भारताने हल्ल्याआधीच पाकिस्तानला पूर्वकल्पना दिल्याने पाकिस्तानने आपली माणसं तिथून (जिथे हल्ला केला जाणार होता ती ठिकाणे) हटवली. तसेच अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी व्यापारावरून धमकी दिल्यानंतर केंद्र सरकारने ऑपरेशन सिंदूर धांबवले,” असा गंभीर आरोप नाना पटोले यांनी केला आहे.
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
पुढे ते म्हणाले की, “अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी एक-दोनदा नव्हे तर डझनभर वेळा सांगितले आहे की आम्ही दोन्ही देशांना समजावलं की तुम्ही युद्ध थांबवा अन्यथा आम्ही तुमच्याबरोबरचा व्यापार बंद करू. ट्रम्प यांच्या इशा-यानंतर ऑपरेशन सिंदूर थांबवण्यात आले,” अशी टीका काँग्रेस नेते नाना पटोले यांनी केली आहे.
नाना पटोले पुढे म्हणाले की, “भारताच्या परराष्ट्रमंत्र्यांनी ऑपरेशन शिंदूरसंदर्भात एक वक्तव्य केले आहे. त्यावरून एक गोष्ट स्पष्ट झाली आहे की भारताने आधी पाकिस्तानला सांगितलं होतं की आम्ही अमुक ठिकाणे लक्ष्य करणार आहोत. तुम्ही तुमच्या लोकांना तिथून हटवा, याचा अर्थ असा की लहान मुलं कॉम्प्युटरवर गेम खेळतात तसा गेम खेळवण्यात आला होता,” असा गंभीर आरोप काँग्रेस नेते नाना पटोले यांनी केला आहे. यामुळे राज्यातील काँग्रेस नेत्यांना ऑपरेशन सिंदूरबाबत शंका असल्याचे दिसून आले आहे.
महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
नाना पटोले यांनी लष्करी कारवाईवर घेतलेल्या संशयामुळे भाजपचे नेते आक्रमक झाले आहेत. भाजप नेते व महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी नाना पटोले यांचा खरपूस समाचार घेतला आहे. सोशल मीडियावर पोस्ट करत चंद्रशेखर बावनकुळे यांनी लिहिले आहे की, ‘ऑपरेशन सिंदूर म्हणजे कॉम्प्युटर गेम आहे’ असं संतापजनक वक्तव्य काँग्रेसचे नेते नाना पटोले
यांनी केलं आणि ‘काँग्रेस का हात पाकिस्तान के साथ’ हे पुन्हा एकदा सिद्ध झालं.भारताच्या शत्रूंच्या मनात भीती निर्माण करणाऱ्या या मोहिमेची हेटाळणी करणं म्हणजे फक्त वीर जवानांचा आणि त्यांच्या शौर्यांचा अपमान नाहीतर संपूर्ण भारतीयांचा अपमान आहे. नाना पटोले यांच्या या बाष्कळ विधानामुळे शहीद जवानांच्या कुटुंबियांना किती वेदना होणार आहेत, याची कल्पना या संवेदनाहीन माणसाला आहे की नाही? असा सवाल बावनकुळे यांनी विचारला आहे.
‘ऑपरेशन सिंदूर म्हणजे कॉम्प्युटर गेम आहे’ असं संतापजनक वक्तव्य काँग्रेसचे नेते @NANA_PATOLE यांनी केलं आणि ‘काँग्रेस का हात पाकिस्तान के साथ’ हे पुन्हा एकदा सिद्ध झालं.
भारताच्या शत्रूंच्या मनात भीती निर्माण करणाऱ्या या मोहिमेची हेटाळणी करणं म्हणजे फक्त वीर जवानांचा आणि…
— Chandrashekhar Bawankule (@cbawankule) June 12, 2025
पुढे बावनकुळे यांनी लिहिले आहे की, “नाना, ऑपरेशन सिंदूर म्हणजे कॉम्प्युटर गेम नाही तर पाकिस्तानी दहशतवाद्यांच्या अड्ड्यावर केलेली धाडसी आणि शौर्याची कारवाई आहे. ही देशद्रोह्यांच्या छातीत धडकी भरवणारी जाज्वल्य शौर्यगाथा आहे! देशाच्या जवानांचं शौर्य, दहशतवादाविरोधातली कारवाई आणि ‘भारत माते’च्या रक्षणासाठीचा लढा काँग्रेसला खेळ वाटतो? तुमचे नेते राहुल गांधी ही परदेशात जाऊन भारताचा अवमान करतात. ‘सर्जिकल स्ट्राइक’चाही पुरावा मागण्याची नीच मानसिकता काँग्रेसनं दाखवली. पण देश उघड्या डोळ्यांनी पाहतोय की कोण वीरांच्या बाजूला आहे, आणि कोण पाकिस्तानच्या! नाना, तुमच्या या देशद्रोही मानसिकतेला देश कधीच माफ करणार नाही. तुमचा मन आणि मेंदू भ्रष्ट झाला आहे. मी तुमच्या नीच मानसिकतेचा कडाडून निषेध करीत आहे.” अशा शब्दांत चंंद्रशेखर बावनकुळे यांनी रोष व्यक्त केला आहे.