मोठी बातमी ! मुख्यमंत्री फडणवीस आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यात बैठक; राजकीय चर्चांना उधाण
मुंबई : गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे हे दोन्ही नेते एकत्र येणार अशा चर्चा सुरु होत्या. असे असताना आता महत्त्वाची घडामोड समोर आली आहे. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राज ठाकरे यांच्यात बैठक सुरु आहे. गेल्या 30 मिनिटांपासून त्यांच्यात बैठक सुरु असल्याची महत्त्वाची माहिती समोर आली आहे.
राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे दोन्ही नेते एकत्र यावे यासाठी प्रयत्न केले जात आहेत. यावरूनच माजी खासदार गजानन कीर्तिकर यांनीही इच्छा व्यक्त केली होती. त्यामध्ये त्यांनी बाळासाहेब ठाकरे हयात असतानाही राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या एकत्र येण्याचे प्रयत्न झाले. मात्र, शिवसेनेत फूट पडली. शिवसेना आणि मनसे वेगळे झाल्यामुळे शिवसेनेचे नुकसान झाले. आता या दोघांनी एकत्र येण्याची वेळ आली आहे. ठाकरे हे नाव एक ब्रँड आहे आणि ते ब्रँडच राहिले पाहिजे. ही जुन्या शिवसैनिकांची इच्छा आहे, असे ते म्हणाले.
हेदेखील वाचा : काँग्रेसकडून राज्यभरात आज काढले जाणार मशाल मोर्चे; जनजागृतीही केली जाणार
दरम्यान, दोन्ही ठाकरे बंधू एकत्र येतील, अशी शक्यता असतानाच आता मुख्यमंत्री फडणवीस आणि राज ठाकरे यांच्यात बैठक होताना दिसत आहे. मुंबईतील ताज लँड्स एंडमध्ये या दोन्ही नेत्यांमध्ये बैठक सुरु आहे. या बैठकीचे कारण अद्याप समोर आले नसले तरी या नेत्यांच्या प्रतिक्रियेनंतर या बैठकीमागचे कारण समोर येऊ शकते, असा अंदाज आता लावला जात आहे.
हेदेखील वाचा : Sangli Politics: चंद्रहार पाटलांसाठी राऊतांनी शिवसेनेची वाट लावली; सांगलीतील पदाधिकाऱ्यांचा संताप