
पुणे : राज्यभरात प्रसिद्धीच्या झोतात आलेल्या लावणी नृत्यांगणा गौतमी पाटीलचा (Gautami Patil) कपडे बदलतानाचा अर्धनग्न व्हिडिओ व्हायरल (Gautami Patil Video) करण्यात आला असून, अज्ञाताने तिच्या नावाने बनावट खाते काढून हा व्हिडिओ व्हायरल केला आहे. कायमच चर्चेत असणाऱ्या गौतमी पाटीलची बदनामी करण्यासाठी हा खोडासळपणा केल्याची शक्यता आहे. पोलिसांनी याप्रकरणी आता गुन्हा नोंद केला आहे.
याप्रकरणी विमानतळ पोलीस ठाण्यात 26 वर्षीय तरुणीने तक्रार दिली आहे. त्यानुसार, अनोळखी खातेधारक यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार दोन दिवसांपूर्वी घडला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, यातील तक्रारदार तरुणी गौतमी पाटील यांच्या सहकारी आहेत. दरम्यान, गौतमी पाटील यांचा कपडे काढतानाचा व्हिडिओ गुपचूप काढण्यात आला. त्यानंतर तो व्हिडिओ गौतमी पाटील यांच्या नावाने बनावट इन्स्टाग्रामवर खाते काढून अपलोड करण्यात आला. तसेच, तो व्हायरल केला गेला. अज्ञाताने इन्स्टाग्रामसोबत व्हॉट्सऍपवर देखील तो व्हिडिओ टाकून प्रसारित केला. हा प्रकार पाटील यांच्या सहकारी तक्रारदार यांच्या निदर्शनास आला. त्यांनी लागलीच विमानतळ पोलिसांकडे धाव घेतली. घटनेची माहिती देऊन तक्रार दिली.
दरम्यान, तक्रारदार तरुणी व त्यांच्या सहकाऱ्यांना संबंधिताने व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देखील दिल्याचे या तक्रारीत म्हटले आहे. पोलिसांनी यानुसार, या खातेधारकांवर गुन्हा नोंद केला आहे. गौतमी पाटील हिच्या नावाने दोन खाते व एका तरुणाच्या नावाने एक खाते अशा तीन खातेधारकांविरोधात गुन्हा नोंद केला गेला आहे. पुढील तपास पोलीस करत आहेत.