दौंड नगरपालिकेच्या निवडणुकीत उमेदवारी बबत निर्णय नाहीच
Daund Politics : दौंड नगरपालिकेच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली असली, तरी अद्याप प्रमुख पक्षांनी आपापले उमेदवार जाहीर केलेले नाहीत. उमेदवारी भरण्याच्या तिसऱ्या दिवशीपर्यंत भाजप, नागरिक हित संरक्षण मंडळ आघाडी, रिपाइं, पीपल्स रिप ब्लिकन पार्टी, राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट), राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) यांनी ‘वेट अँड वॉच’ धोरण अवलंबल्याचे चित्र आहे. त्यामुळे इच्छुक उमेदवार उमेदवारी जाहीर होण्याकडे उत्सुकतेने पाहत आहेत.
भाजप आणि नागरिक हित संरक्षण मंडळ यांनी एकत्रितपणे निवडणूक लढविण्याचे संकेत दिले आहेत. या पार्श्वभूमीवर आमदार राहुल कुल आणि ज्येष्ठ नगरसेवक प्रेमसुख कटारिया यांनी बैठकींचा धडाका सुरू केला आहे. मात्र, अद्याप उमेदवार जाहीर न केल्याने कार्यकर्त्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण आहे. पक्षांतर्गत बंडाळी टाळण्यासाठी निर्णय लांबविण्यात येत असल्याची चर्चा आहे.
दुसरीकडे, राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) कडून प्रभागनिहाय उमेदवारांची चाचपणी विरधवल जगदाळे करत असून, त्यांनीही अद्याप एकही उमेदवार जाहीर केलेला नाही. या गटाकडून अन्य पक्षांसोबत युती होण्याची शक्यता देखील तपासली जात असल्याचे समजते.
दरम्यान, महाविकास आघाडीने सर्व जागांवर निवडणूक लढविण्याची घोषणा केली असली, तरी त्यांनीही आपले उमेदवार अद्याप जाहीर केलेले नाहीत. आघाडीत अंतर्गत मतभेद उफाळल्याने, नवीन युती घडण्याची शक्यता असल्याची कुजबुज शहरात सुरू आहे.
नगराध्यक्षपद ओबीसी महिला राखीव असल्याने सर्व पक्षांमध्ये चर्चेला उधाण आले आहे. या पदासाठी मराठा–कुणबी समाजातील अनेक इच्छुकांनी भाजपा–नागरिक हित संरक्षण मंडळ आघाडी आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) या दोन्हींकडून उमेदवारीची मागणी केली आहे. त्यामुळे दोन्ही गटांसमोर निर्णयाचा पेच निर्माण झाला आहे. महाविकास आघाडीकडून मात्र नगराध्यक्षपदाच्या उमेदवाराबाबत गुप्तता पाळली जात असून, त्यावर फक्त चर्चांचा भडिमार सुरू आहे.
शहरातील मुस्लिम, मागासवर्गीय आणि ख्रिश्चन समाजाचे मतदारसंघ निर्णायक ठरण्याची शक्यता असल्याने उमेदवारी ठरविताना सामाजिक संतुलन राखण्याचे मोठे आव्हान सर्व पक्षांसमोर आहे. राजकीय समीकरणे अजून स्पष्ट नसली तरी आगामी काळात ‘फोडाफोडीचे राजकारण’ तापण्याची शक्यता व्यक्त होत आहे. शेवटी कोण बाजी मारणार, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. एकंदरीतच, दौंड नगरपालिका निवडणूक चुरशीची आणि रंगतदार होण्याचे संकेत सध्या स्पष्टपणे दिसत आहेत.






