सौजन्य - नवराष्ट्र टीम
दौंड तालुक्यातील ७ जिल्हा परिषद आणि १४ पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी शनिवारी ( दि. ७) सकाळी साडेसात वाल्यापासून मतदान प्रक्रियेला सुरूवात झाली. सकाळपासून दुपारी दीड वाजेपर्यंत अवघे ३५. ८६ सरासरी टक्के मतदान झाले होते. तर साडेतीन वाजेपर्यंत ५०.८१ टक्के सरासरी मतदान झाले. साडेतीन ते साडेपाच वाजेपर्यंत १८ टक्क्यांनी मतदानांच्या टक्केवारीत वाढ झाली. साडे सात ते साडेपाच पर्यंत ६८.४८ टक्के मतदान झाले. मात्र, दुपारपर्यंत अनेक मतदान केंद्रावर शुकशुकाट पाहायला मिळाला.
पाटस जिल्हा परिषद गटात आणि मोठ्या मतदान केंद्रावर दुपारपर्यंत फारशी गर्दी नसल्याचे चित्र दिसून आले. परिणामी उमेदवारामध्ये चिंता वाढली होती. तालुक्यातील कुरकुंभ, रावणगाव, खडकी, गोपाळवाडी, मलठण,कानगाव, वरवंड या मतदान केंद्रावरील काही बुथमध्ये मतदार रांगेत उभे राहून मतदान करीत असल्याचे चित्र पहायला मिळाले. मात्र काही गावांमधील मतदान केंद्रावर अत्यंत कमी प्रमाणात मतदानाची टक्केवारी पाहायला मिळाली. जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीत मतदारांमध्ये फारसा उत्साह दिसून आला नाही.
दरम्यान शनिवारी लग्नसराईची गडबड पाहायला मिळाली. वाड्या वस्तीवरील मतदारांनी आणइ उच्चशिक्षित मतदारांनीही या मतदान प्रक्रियेकडे पाठ फिरवली असल्याचे चित्र होते. दुपारी दोन वाजताच्या नंतर काही मतदान केंद्रावर थोड्याफार प्रमाणात गर्दी दिसून आली. संध्याकाळी साडे पाच पर्यंतही मतदान प्रक्रिया किरकोळ वाद वगळता शांततेत पार पडली.
दिव्यांग मतदारांसाठी स्वतंत्र कक्ष स्थापन
जिल्हा परिषद आणि पंचायत समिती गणात एकुण २ लाख ७३ हजार १०० पैकी १ लाख ८७ हजार ९ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला यामध्ये पुरुष ९९ हजार ९०० तर महिला मतदार ८७ हजार १०६ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. एकुण ६८.४८ टक्के मतदान झाले आहे. दरम्यान , मतदान केंद्रावर पोलीसांचा चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता. ज्येष्ठ आणि दिव्यांग मतदारांसाठी स्वतंत्र कक्ष स्थापन करून व्यवस्था करण्यात आली होती. जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीसाठी उभे असलेल्या उमेदवारांचे भवितव्य मतपेटीत बंद झाले.
अंदाज बांधणे झाले कठीण
मतदान प्रक्रियानंतर झालेल्या आकडेवारीची जुळवाजुळव करत प्रत्येक उमेदवारांनी आपणच विजयी होणार असल्याचा दावा व्यक्त केला आहे. दरम्यान, पाटस, वरवंड , खडकी, गोपाळवाडी गटात क्रॉस मतदान झाल्याचे चित्र पाहायला मिळाले. त्यामुळे या गटात कोणत्या पक्षाचा उमेदवार विजयी होणार याबाबत अंदाज बांधणे कठीण झाले आहे. मात्र,पाटस , खडकी ,गोपाळवाडी , केडगाव या गटात काटे की टक्कर अशी लढत होणार आहे. दौंड मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसने ४ जिल्हा परिषद गटावर विजयाचा दावा केला आहे तर भाजपने ५ गटावर विजयाचा दावा केला आहे. मात्र मतमोजणी सोमवारी (दि. ९) होणार असल्याने या मत मोजणीकडे उमेदवार आणि मतदारांचे लक्ष लागले आहे.






