मुंबई – लोकसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील राजकारण रंगले आहे. सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुन्हा एकदा ठाकरे गटाचे नेते उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे. फडणवीस यांनी एका मुलाखतीमध्ये उद्धव ठाकरेंवर टीकास्त्र डागले असून त्यांना ‘कागदी वाघ’ असा खोचक टोला लगावला आहे.
बाळासाहेब ठाकरेंच्या संपत्तीचे वारस उद्धव ठाकरे
देवेंद्र फडणवीस यांनी एका मुलाखतीमध्ये उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली. फडणवीस म्हणाले, “उद्धव ठाकरे म्हणत आहेत की अब की बार तडीपार. पण हरकत नाही, कमीत कमी या कारणांमुळे उद्धव ठाकरे लोकांमध्ये जात आहेत. ड्रॉईंग रुमचं राजकारण करणारे उद्धव ठाकरे होते. दाल-आटे का भाव आता त्यांना समजला असेल. महाराष्ट्रातल्या लोकांना हे माहीत आहे की बाळासाहेब ठाकरे म्हणाले होते की ज्यादिवशी काँग्रेससह जावं लागेल मी शिवसेना नावाचं माझं दुकान बंद करेन. तरीही उद्धव ठाकरे काँग्रेसबरोबर गेले आहेत. मला असं वाटतं बाळासाहेब ठाकरेंच्या संपत्तीचे वारस उद्धव ठाकरे आहेत पण बाळासाहेबांच्या विचारांचे वारसदार एकनाथ शिंदे आहेत,” असा विश्वास फडणवीसांनी व्यक्त केला.
उद्धव ठाकरे हे कागदी वाघ
पुढे ते म्हणाले, “उद्धव ठाकरे हे कागदी वाघ आहेत. त्यांनी त्यांच्या आयुष्यात एकही आंदोलन केलं नाही. कधी तुरुंगात गेले नाहीत. कधीही कुठल्या धरणे आंदोलनात सहभागी झाले नाहीत. तसेच पूर्ण आयुष्यात त्यांनी घोषणाही दिलेल्या नाहीत. आता ते आम्हाला डरपोक म्हणत आहेत. आपल्या देशात पंतप्रधान मोदी असे आहेत ज्यांनी दाखवून दिलं की पाकिस्तानला घरात घुसून मारु शकतो. आता उद्धव ठाकरे ज्यांनी आयुष्यात डासही मारलेला नाही ते आम्हाला पाकिस्तानबाबत सांगत आहेत. मच्छरही ज्यांनी मारला नाही त्यांचं आम्ही कशाला ऐकू. चीनकडून पैसे घेऊन पक्ष चालवणारे जे आहेत त्यांच्या बरोबर उद्धव ठाकरे बसले आहेत. त्यांना लाज वाटली पाहिजे,” असा घणाघात देवेंद्र फडणवीस यांनी केला.
उद्धव ठाकरेंचा निर्लज्जपणा
“मुख्यमंत्रिपदाच्या खुर्चीसाठी उद्धव ठाकरेंनी आमच्या पाठीत खंजीर खुपसला हे सगळ्या देशाला माहीत आहे. कारण पहिल्या दिवसापासून हे ठरलं होतं की भाजपाचा मुख्यमंत्री होईल. सगळ्या प्रचारसभांमध्ये मोदी, अमित शाह आणि उद्धव ठाकरेही हे सांगत होते की पुढचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होतील. उद्धव ठाकरेंनी आम्हाला दगा दिला आहे, आमच्याशी बेईमानी केली आहे. इतकं सगळं करुन आम्हाला दुषणं देणं हा निर्लज्जपणा आहे.” असंही देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत.