पिंपरी : बनावट कागदपत्रांच्या आधारे बांधकाम व्यावसायिक आणि शेतकर्यांची तब्बल 114 कोटी रुपयांची आर्थिक फसवणूक (Fraud of Crores of Rupees) करण्यात आली. त्या प्रकरणी एन्वायरंट डेव्हलपर्स प्रायव्हेट लिमिटेडचे संचालक जयंत वल्लभदास कनेरिया, मोहन पांडुरंग कलाटे, धीरजलाल गोरधनदास हंसलिया, मॉन्ट वर्ट बिल्डर्स प्रायव्हेट लिमिटेड आणि नीरज कुमार असोसिएटस प्रायव्हेट लिमिटेडचे संचालक निखिल वल्लभदास कनेरिया, नीरज जयंत कनेरिया, कुमार रणजीत निम्हण आणि पवन कंकालिया आणि वित्तीय संस्था विस्त्रा आयटीसी इंडिया व मोतीलाल ओसवाल रियल इस्टेट इन्वेस्टर यांच्यावर शिवाजीनगर प्रथमवर्ग न्यायालयाच्या आदेशावरून वाकड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती उच्च न्यायालयाचे वकील ॲड. सत्यजित काकडे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
या पत्रकार परिषदेला प्रमुख उपस्थिती ॲड. सत्यजित काकडे, ॲड. किरण शिंदे, प्रगतशील शेतकरी स्वप्निल कलाटे, रयत विद्यार्थी परिषदेचे अध्यक्ष सूर्यकांत सरवदे, सचिव रविराज काळे आदी यावेळी उपस्थित होते. या प्रकरणातील मुख्य आरोपी जयंत कनेरिया यांनी स्वतःच्या मुलाच्या व भावाच्या नावे मॉन्ट वर्ट बिल्डर्स प्रा. लि आणि नीरज कुमार असोसिएट्स प्रा. लि. दोन कंपन्या स्थापन करून स्वतः संचालक असलेल्या एन्वायरंट डेव्हलपर्स प्रा. लि कंपनीच्या सर्व्हे क्रमांक 277 मध्ये पॅनोरमा प्रकल्पाकरिता 44 कोटी 40 लाख आणि सर्व्हे क्रमांक 195/1 व 196/3 मध्ये वेदांता प्रकल्पाकरिता 12 कोटी 30 लाख रूपये प्रकल्प निधी उभारण्याचे प्रायोजनाची तरतूद केली होती.
दोन्ही प्रकल्पांसाठी लागणारे एकूण रक्कम 56 कोटी 70 लाख विस्त्रा व मोतीलाल ओसवाल या वित्तीय कंपन्यांनी देण्याची कबूल केले होते. जयंत कनेरिया यांनी मोहन कलाटे व धीरजलाल हंसलिया या संचालकांना हाताशी धरून संचालकपदाचा गैरवापर करत बनावट ठराव करून विस्त्रा आणि मोतीलाल ओसवाल वित्तीय कंपन्यांसोबत दोन गहाणदस्त करुन 114 कोटी रुपये कर्ज घेतले. जयंत कनेरिया यांनी स्वतःच्या मुलाच्या व भावाच्या दोन कंपन्यांमध्ये 57 कोटी 90 लाख रुपये परस्पर वर्ग केले.
याप्रकरणी संचालक संजय पांडुरंग कलाटे आणि शेतकरी वसंत कलाटे यांची कोणतीही संमती न घेता दोन परस्पर गहाणदस्त केले. जेव्हा जयंत कनेरिया, धीरजलाल हंसलिया आणि मोहन कलाटे या संचालकांना सर्व्हे क्रमांक 277 व सर्व्हे क्रमांक 195/1 आणि 196/3 मिळकतीच्या विकसनबाबत विचारणा केली. तेव्हा दोन्ही गहाणदस्त संचालक संजय कलाटे व शेतकरी वसंत कलाटे यांच्यापासून दस्त अस्तित्वात आल्यापासून लपवून ठेवण्यात आले. याबाबत वेळोवेळी विचार केला असता माहिती देणे टाळाटाळ करण्यात आली.