देहूरोड : यंदा दोन वर्षांच्या खंडानंतर आषाढी एकादशी दिवशी पायी वारी पंढरपूरला जाणार आहे. दरवर्षी भाविक मोठ्या उत्साहाने टाळ, मृदुंगाच्या तालात डोलत मुखी विठू माऊलीचं नाव घेत वारी चालतात. त्यामुळे यावारीचं एक विशेष आकर्षण असते. यंदा १० जुलैला पार पडणार्या आषाढी एकादशी सोहळ्यासाठी २० जूनला देहूमधून संत तुकाराम महाराजांची पालखी प्रस्थान ठेवणार असल्याची माहिती देहू संस्थांच्या वतीने देण्यात आली.
यावेळी नितीन महाराज मोरे, संजय महाराज मोरे, विशाल महाराज मोरे आदी उपस्थित होते. दरम्यान, २१ जूनला संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी आळंदी येथून प्रस्थान ठेवणार आहे.
यंदा ३२९ दिंड्या सहभागी होणार
यंदा तुकोबारायांच्या पालखी सोहळ्यात एकूण ३२९ दिंड्या सहभागी होणार आहेत. पायी प्रवास पूर्ण करून पालखी ९ जुलैला पंढरपूरमध्ये दाखल होणार आहेत. तर १० जुलैला आषाढी एकादशी साजरी होईल. तर संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी ही आळंदी येथून २१ जूनला प्रस्थान करणार आहे.
वारकऱ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण
यंदा कोरोना संकट आटोक्यात असल्याने पायी वारी साठी सरकारने परवानगी दिली आहे. त्यामुळे संत ज्ञानेश्वर आणि संत तुकाराम महाराजांच्या पालखीमध्ये सहभागी होण्यासाठी वारकर्यांमध्ये उत्साह आला आहे.
तुकाराम महाराजांच्या पालखीतील महत्त्वाचे दिवस
पालखी प्रस्थान – २० जून
पहिलं गोल रिंगण – ३० जून (बेलवंडी)
दुसरं गोल रिंगण – २ जुलै (इंदापूर)
तिसरं गोल रिंगण – ५ जुलै (अकलूज माने विद्यालय)
पहिलं उभं रिंगण – ६ जुलै (माळीनगर)
दुसरं उभं रिंगण -८ जुलै (बाजीराव विहीर)
तिसरं उभं रिंगण – ९ जुलै (पादुका आरती)