anil deshmukh Criticized devendra fadanvis
मुंबई: माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, आमदार आदित्य ठाकरे आणि अजित पवार, पार्थ पवार आणि अनिल परब यांना अडकवण्यासाठी माझ्यावर भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी दबाव टाकला होता. समित कदम नावाच्या व्यक्तीकडे तीन–चार मुद्दे असलेले एक एन्व्हलप पाठवून त्याचे प्रतिज्ञापत्र करून देण्यासाठी माझ्यावर हा दबाव टाकण्यात आला. समित कदम हा फडणवीसांचा जवळचा माणूस आहे. त्याचे आणि फडणवीसांचे घनिष्ठ संबंध आहेत, असा गंभीर आरोप माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केले आहे. विशेष म्हणजे फडणवीस आणि समित कदम यांचे फोटोही त्यांनी यावेळी दाखवले.
माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी आज पत्रकार परिषद घेत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर गंभीर आरोप केले आहेत. अनिल देशमुख म्हणाले, “तीन वर्षांपूर्वी देवेद्र फडणवीसांनी सुमित कदमला माझ्याकडे पाच सहा वेळा पाठवले. एकदा समित माझ्याकडे तीन एन्व्हलप घेऊन आला आणि त्याचे प्रतिज्ञापत्र करून द्या, असे त्याने मला सांगितले. त्या प्रतिज्ञा पत्रात, उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, अजित पवार आणि अनेक नेत्यांवर खोटे आरोप करायचे आणि त्या आरोपांचे मी प्रतिज्ञापत्र करून द्यायचे होते.
‘हे एन्व्हलप घेऊन येणारा समित कदम आणि देवेंद्र फडणवीस यांचे जवळचे संबंध आहेत. कदम यांची पत्नी फडणवीसांना राखी बांधते. समित कदम साधा कार्यकर्ता आहे तो नगरसेवकही नाही, तरीही फडणवीसांनी त्याला वाय सुरक्षा दिली आहे. मग हा साधा नगरसेवकही नसताना फडणवीसांनी त्याला वाय सुरक्षा देण्याचे कारण काय, असा सवालही देशमुख यांनी यावेळी उपस्थित केला. तसेच, तुम्ही मिरज सांगली या भागात चौकशी केली तर समित कदम आणि फडणवीसांचे काय संबंध आहेत हे कुणीही सांगेल, असेही त्यांनी यावेळी सांगितले.
अनिल देशमुख म्हणाले, ” माझ्यावर ज्या पद्धतीने हा दबाव टाकण्यात आला, उद्धव ठाकरे हे राजकीय विरोधक आहेत हे मी समजू शकतो, पण त्यांच्या मुलालाही आदित्य ठाकरे यांनाही अडकवण्याचा प्रयत्न करण्यात आला. अजित पवार हेही त्यावेळी विरोधक होते, तेव्हा त्यांच्याही मुलाला म्हणजे पार्थ पवार यांच्यावरही आरोप करण्याचा प्रयत्न केला. म्हणजे, कशा पद्धतीने राजकीय नेत्यांच्या मुलालाही खोट्या आरोपांमध्ये अडकवता येईल, यापद्धतीचा प्रयत्न देवेंद्र फडणवीसांनी तीन वर्षांपूर्वी केला.
‘मी जर तीन वर्षांपूर्वी त्यांनी पाठवलेल्या मुद्द्याचे प्रतिज्ञापत्र करून दिले असते, तर उद्धव ठाकरे अडचणीत आले असते. आदित्य ठाकरेंना यांनी खोट्या आरोपांमध्ये तुरुंगात टाकले असते. राजकारणात नव्याने आलेल्या लहान मुलांनाही घाणेरड्या राजकारणात ओढण्याचा फडणवीसांनी प्रयत्न केला. एक तर तुरुंगात जा किंवा भाजपामध्ये या हेच यांचे धोरण होते.” असेही अनिल देशमुखांनी यावेळी स्पष्ट केले.
‘माझ्यावर पहिला प्रयोग केला, पण तो यशस्वी झाला नाही. म्हणून त्यांनी दुसरा प्रयोग एकनाथ शिंदेंवर केला आणि तो यशस्वीही झाला. तिसरा प्रयोग अजित दादांवर केला, तोही यशस्वी झाला. माझ्यावर जो प्रयोग केला तो यशस्वी झाला असता तर तीन वर्षांपूर्वीच उद्धव ठाकरे यांचे सरकार पडले असते, असेही अनिल देशमुखांनी यावेळी सांगितले.