माजी मंत्री धनंजय मुंडे विधीमंडळ आवारातून बीडमधील लैंगिक अत्याचार प्रकरणावरुन आक्रमक झाले (फोटो - सोशल मीडिया)
मुंबई: संतोष देशमुख हत्या प्रकरण आणि कृषी खात्यातील कथित घोटाळ्याच्या आरोपांमुळे चर्चेत असलेले अन्न व नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे यांनी आज (4 मार्च) आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा दिला. त्यांच्या सहाय्यक प्रशांत भामरे आणि प्रशांत जोशी यांनी सागर बंगल्यावर जाऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे राजीनामा सुपूर्द केला. यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी धनंजय मुंडेंना कार्यमुक्त केल्याची अधिकृत घोषणा केली. आता राजीनाम्यानंतर ते अर्थसंकल्पीय अधिवेशनासाठी सभागृहात उपस्थित राहणार की नाही, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
मुख्यमंत्र्यांनी धनंजय मुंडेंचा मंत्रिपदाचा राजीनामा स्वीकारला आहे. त्यामुळे आता त्यांच्या पुढील राजकीय वाटचालीबाबत चर्चा सुरू झाली आहे. त्यांची आमदारकी कायम राहणार का?, हा प्रश्नही उपस्थित होत आहे. मात्र, सध्या तरी त्यांच्या आमदारकीवर कोणताही धोका नाही.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात धनंजय मुंडे यांना सध्या सहआरोपी करण्यात येणार नसल्याची खात्रीलायक माहिती मिळाली आहे. चार्जशीटमध्ये त्यांच्याविरोधात कोणताही ठोस पुरावा नसल्याची माहिती समोर आली आहे. तसेच मुख्यमंत्री कार्यालयाकडूनही यासंदर्भात कोणतीही कार्यवाही करण्यात आलेली नाही. मंत्रिपदाच्या राजीनाम्यानंतर त्यांच्या संदर्भात पुढील कायदेशीर व राजकीय घडामोडींकडे लक्ष राहील. विरोधकांचा आरोप होता की, धनंजय मुंडे मंत्रिपदावर राहिल्यास संतोष देशमुख हत्या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी होऊ शकणार नाही. त्यामुळे राजीनाम्यानंतर या प्रकरणाच्या तपासाची दिशा कशी राहते, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
संतोष देशमुख हत्या प्रकरण आणि वाल्मिक कराडची पार्श्वभूमी
दरम्यान, वाल्मिक कराड हा बीड जिल्ह्यात धनंजय मुंडे यांचा सर्वात विश्वासू सहकारी म्हणून ओळखला जात होता. निवडणुकीच्या काळात प्रचार व्यवस्थापन आणि त्यांच्या अनुपस्थितीत जिल्ह्यातील काही जबाबदाऱ्या त्याच्याकडे असल्याचे सांगितले जाते.
Dhananjay Munde News : धनंजय मुंडेच्या राजीनाम्यानंतर आता मंत्रिपदासाठी रस्सीखेच
वाल्मिक कराडने ‘आवादा’ या पवनचक्की निर्मिती कंपनीकडून 2 कोटी रुपयांची खंडणी मागितल्याचा आरोप आहे. या कारणावरून कंपनी प्रशासन आणि वाल्मिक कराड यांच्यात वाद निर्माण झाला. या वादाच्या पार्श्वभूमीवर वाल्मिक कराडच्या सहकाऱ्यांनी आवादा कंपनीत जाऊन सुरक्षारक्षकाला मारहाण केली.
मारहाण झालेला सुरक्षारक्षक मस्साजोग गावातील असल्याने गावाचे सरपंच संतोष देशमुख यांनी या प्रकरणात हस्तक्षेप केला. गावकऱ्यांसह ते आवादा कंपनीत गेले आणि त्यांनी वाल्मिक कराडच्या टोळीतील लोकांना चोप दिला. हा वाद 6 डिसेंबर 2024 रोजी झाला. याच भांडणाचा राग मनात ठेवून, वाल्मिक कराडच्या सांगण्यावरून त्याच्या साथीदारांनी संतोष देशमुख यांचे अपहरण करत त्यांची निर्घृण हत्या केली.