File Photo : Narhari-Zirwal
मुंबई : राज्य सरकार धनगर समाजाला अनुसूचित जमातीतून (एसटी) आरक्षण देण्याची शक्यता लक्षात घेता आदिवासी समाजाने सरकारला विरोध करायला सुरुवात केली. त्यामुळे राज्यात आता ओबीसी-मराठा नंतर धनगर-आदिवासी वाद उफाळण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
राज्य सरकारच्या या निर्णयाला विरोध करण्यासाठी मुंबईतील महिला आर्थिक विकास महामंडळाच्या सभागृहात राज्यातील सर्व आदिवासी आमदारांच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते नरहरी झिरवाळ यांनी धनगर समाजाला अनुसूचित जमातीच्या प्रवर्गातून आरक्षण देण्याला आपला स्पष्ट विरोध दर्शविला.
सर्वोच्च न्यायालय आणि उच्च न्यायालयाने धनगर आणि धनगड हे वेगळे आहे, असे सांगूनही राज्य सरकार आगामी निवडणूक डोळ्यांसमोर ठेवून धनगर आरक्षणाचा जीआर काढत आहे. मात्र, सरकारने लक्षात घ्यावे की, सरकारने जीआर काढला तर सर्व आदिवासी आमदार राजीनामा देतील, असा इशारा नरहरी झिरवाळ यांनी दिला.
लक्ष्मण हाकेंचेही उपोषण सुरु
मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील आरक्षणासाठी उपोषणाला बसले असताना त्यांना प्रत्युत्तर देण्यासाठी लक्ष्मण हाके आंदोलन करत आहे. यावेळी जरांगे पाटील यांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची फूस असल्याचा आरोप हाके यांनी केला होता. यावर शिंदे गटाकडून हाकेंना जोरदार प्रत्त्युत्तर देण्यात आले आहे.
ओबीसींचा पुळका का?
हाके हे 17 नेत्यांचे आणि पक्षांचे उंबरठे झिजवून आलेत. आता ओबीसीचा कैवार दाखवत आहेत. हाके ज्या समाजातून येतात, तो धनगर समाज एसटीमधून आरक्षण मागत असताना तिथे हे संघर्ष करत नाहीत, त्याकडे त्यांचे दुर्लक्ष आहे. इकडे ओबीसींचा पुळका आल्याचे दाखवून भांडणे उकरून काढण्याचे काम ते करतात. लक्ष्मण हाके हा सुपारीबाज माणूस आहे. दोन समाजात भांडणे लावण्यासाठी त्यांना भाडोत्री घेतले आहे, असा आरोप संजीव भोर पाटील यांनी केला.






