सौजन्य - नवराष्ट्र टीम
धाराशिव : शेतकऱ्यांना शेतीसाठी सुरळीत वीजपुरवठा मिळत नसल्याचा मुद्दा उपस्थित करत धाराशिव-कळंबचे आमदार कैलास पाटील यांनी नांदेड येथे झालेल्या दुष्काळी आढावा बैठकीत सरकार व महावितरणच्या अधिकाऱ्यांना जाब विचारला. ‘इमर्जन्सी लोडशेडिंग’च्या मुद्द्यावरून बैठकीत आमदार पाटील आणि महावितरणच्या अधिकाऱ्यांमध्ये जोरदार खडाजंगी झाली. कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक झाली. यावेळी ऊर्जा राज्यमंत्री मेघना बोर्डीकर यांच्यासह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
आमदार पाटील यांनी “इमर्जन्सी लोडशेडिंग कशासाठी करता?” असा थेट सवाल केला. त्यावर लोडशेडिंग होत नसल्याचे सांगण्यात आले. मात्र, अधिकाऱ्यांकडे माहिती विचारल्यानंतर “कधी कधी इमर्जन्सी लोडशेडिंग होते,” असे उत्तर देण्यात आले. यावर पाटील यांनी आक्षेप घेत, “कधी कधी नाही, रोजच लोडशेडिंग आहे,” असे सांगितले. विशेषतः संध्याकाळच्या वेळेत वीजपुरवठा खंडित होत असल्याने शेतकऱ्यांना अडचणींचा सामना करावा लागत असल्याचे त्यांनी बैठकीत नमूद केले.
बैठकीदरम्यान महावितरणचे संचालक धनंजय औंडेकर व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे सहभागी झाले. राज्यात लोडशेडिंग नसल्याचे त्यांनी सांगितल्यानंतर पाटील यांनी त्यावर तीव्र आक्षेप घेतला. “आपण खोटे बोलू नका. लोडशेडिंग आहे. खोटे बोलणे चुकीचे आहे. रोज संध्याकाळी इमर्जन्सी लोडशेडिंग केली जाते,” असे पाटील यांनी सुनावले. वीज उपलब्धतेत कमतरता असेल तर वीज खरेदी करून शेतकऱ्यांना पुरवठा सुरळीत करावा, अशी मागणीही त्यांनी केली. प्रत्यक्ष गावपातळीवरील परिस्थिती आणि अधिकाऱ्यांकडून बैठकीत दिली जाणारी माहिती यात विसंगती असल्याचा मुद्दा त्यांनी उपस्थित केला.
‘यापुढे लोडशेडिंग होणार नाही याची काळजी घ्या’
आमदार पाटील यांच्या भूमिकेनंतर कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी हस्तक्षेप करत महावितरणच्या अधिकाऱ्यांना या मुद्द्याची गांभीर्याने दखल घेण्याच्या सूचना दिल्या. “यापुढे लोडशेडिंग होणार नाही, याची काळजी घ्या,” असे निर्देश भरणे यांनी दिले. ऊर्जा राज्यमंत्री मेघना बोर्डीकर यांनीही वीजपुरवठा सुरळीत ठेवण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना केल्या. दुष्काळी परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी झालेल्या बैठकीत लोडशेडिंगचा प्रश्न ऐरणीवर आल्याने शेतकऱ्यांच्या वीजपुरवठ्याचा मुद्दा चर्चेचा केंद्रबिंदू ठरला.






