सौजन्य - नवराष्ट्र टीम
धाराशिव : धाराशिव जिल्ह्यातील आठही तालुक्यांत पावसाचा प्रदीर्घ खंड पडल्याने खरीप पिकांची परिस्थिती गंभीर झाली आहे. त्यामुळे संपूर्ण जिल्ह्यात तातडीने कोरडा दुष्काळ जाहीर करण्यासाठी आवश्यक तांत्रिक बाबींसह शासनस्तरावर पाठपुरावा सुरू असल्याची माहिती आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी दिली. धाराशिव तालुक्यातील उपळा शिवारात ग्रामस्थ व शेतकऱ्यांच्या उपस्थितीत झालेल्या घोंगडी बैठकीत ते बोलत होते. यावेळी त्यांनी शिवारात जाऊन पावसाच्या खंडामुळे नुकसान झालेल्या खरीप पिकांची पाहणी केली.
जिल्ह्यातील पीक परिस्थितीचा वस्तुनिष्ठ अहवाल तयार करण्यासाठी विद्यापीठातील शास्त्रज्ञ, मुंबईतील आयआयटीचे वरिष्ठ तज्ज्ञ तसेच महसूल व कृषी विभागाच्या पथकाने प्रत्यक्ष पाहणी केली आहे. या पाहणीचा सविस्तर अहवाल जिल्हाधिकाऱ्यांमार्फत राज्य शासनाला सादर करण्यात आला आहे. पिकांची सद्यस्थिती, पावसातील खंड आणि संभाव्य नुकसान याबाबतची तांत्रिक माहिती अहवालात नमूद करण्यात आली आहे. आगामी पंचनामे व नुकसानभरपाई निश्चित करताना या अहवालाचा उपयोग होणार असल्याचे पाटील यांनी सांगितले.
पाणी, चाऱ्यासह रोजगाराला प्राधान्य
दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर पिण्याच्या पाण्याचे नियोजन करण्याच्या सूचना प्रशासनाला देण्यात आल्या आहेत. पाणीटंचाईची शक्यता असलेल्या भागात तातडीने टँकर भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. पावसाअभावी पशुधनाच्या चाऱ्याचा प्रश्नही गंभीर होण्याची शक्यता असल्याने चारा डेपो सुरू करण्याची पूर्वतयारी पूर्ण करण्यात आली आहे. आवश्यकतेनुसार त्याबाबत तातडीने निर्णय घेतला जाणार असल्याचे पाटील यांनी स्पष्ट केले. शेतीचे उत्पन्न संकटात आल्याने ग्रामीण कुटुंबांना आर्थिक आधार मिळावा, यासाठी प्रत्येक गावात रोजगार हमीची कामे मोठ्या प्रमाणावर सुरू करण्याचे नियोजन करण्यात आले आहे.
नुकसानभरपाईनंतर पीकविम्यासाठी पाठपुरावा
नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना खरीप नुकसानीचे अनुदान तातडीने मिळावे, यासाठी प्रयत्न सुरू असून त्यानंतर पीकविम्याची रक्कमही लवकर मिळवून देण्यासाठी पाठपुरावा केला जाणार असल्याचे आमदार पाटील यांनी सांगितले.






