Photo Credit : Team Navrashtra
पुणे : प्रशिक्षणार्थी आयएएस पूजा खेडकरच्या अडचणी दिवसेंदिवस वाढच चालल्या आहेत. पूजा खेडकर यांचे महाराष्ट्रात सुरू असलेले प्रशिक्षण रद्द करण्यात आले आहे. तसेच मसुरी येथील लाल बहादूर शास्त्री नॅशनल ॲकॅडमी ऑफ ॲडमिनिस्ट्रेशन (LBSNAA) मध्ये तातडीने उपस्थित राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
त्यानंतर त्यांचे वडीलही त्यांच्या संपत्तीमुळे अडचणीत आले आहेत. लाचलुचपत विभागाने (एसीबी) दिलीप खेडकर यांच्यावर कारवाईचा बडगा उगारला आहे. अहमदनगरच्या लाचलुचपत विभागाकडून दिलीप खेडकर यांच्या संपत्तीची चौकशी करण्यात येणार आहे. याचे कारण म्हणजे उत्पन्नापेक्षा त्यांची संपत्ती जास्त असल्याचे एका तपासात आढळून आल्यानंतर आता नगर लाचलुचपत विभाग त्यांच्या संपत्तीची चौकशी करणार आहे. या प्रकरणात ते दोषी आढळू आल्यास त्यांना अटक होण्याची शक्यताही वर्तवण्यात आली आहे. त्यासोबतच आयकर विभागानेही त्यांच्या संपत्तीची माहिती मागवली आहे.
एका वृत्तवाहिनीच्या रिपोर्टनुसार, पूजाचे वडील दिलीप खेडकर हे महाराष्ट्र शासनाचे निवृत्त प्रशासकीय अधिकारी असून त्यांच्या नावावर सुमारे ४० कोटी रुपयांची संपत्ती आहे. निवृत्तीनंतर त्यांनी राजकारणात नशीब आजमावण्याचा प्रयत्न केला.
2024 मध्ये त्यांनी अहमदनगर मतदारसंघातून बहुजन आघाडीच्या तिकिटावर लोकसभा निवडणुकही लढवली. पण यात त्यांचा पराभव झाला. निवडणुकीवेळी त्यांनी सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रातही त्यांची संपत्ती तब्बल 40 कोटींची असल्याचे आणि शेतीतून 43 लाख वार्षिक उत्पन्न असल्याचे दाखवले आहे. त्यामुळे पूजा खेडकर यांच्या नॉन क्रीमिलेअर प्रमाणपत्रावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.
वर्षाला 8 लाखांपेक्षा कमी उत्पन्न असलेल्यांनाच नॉन क्रिमिलेअरचे प्रमाणपत्र दिले जाते. त्यामुळे वडिलांची 40 कोटींचं उत्पन्न असताना पूजा खेडकर यांना नॉन क्रिमिलेयरअंतर्गत प्रमाणपत्र कसे मिळाले? असा सवाल उपस्थित केला जात आहे. दरम्यान, यासंदर्भात त्यांना विचारले असता, पूजा खेडकर यांनी नियमानुसारच दिव्यांग व क्रिमिलेअरचे प्रमाणपत्र घेतले असून यूपीएससीने त्याची तपासणी केल्याचे त्यांनी सांगितले होते. तसेच, तुमच्याकडे कोट्यवधींची संपत्ती असतानाही तुम्हाला नॉन क्रिमिलेअर प्रमाणपत्र कसे मिळाले, असा सवाल विचारला असता हे प्रमाणपत्र नियमानेच मिळाल्याचे दिलीप खेडकर यांनी सांगतिले.






