आळंदी : माऊलींचे पायीवारी पालखी सोहळा (Palakhi Sohola) आषाढी यात्रेस राज्यासह परिसरातून आळंदीत खांद्यावर भगव्या पताका, गळ्यात तुळशी माळ, कपाळी बुक्का अन् मुखाने हरिनामाचा जयघोष करत लाखो भाविक असतात. यावर्षीचे पालखी सोहळ्याचे आळंदी मंदिरातून 11 जूनला हरिनाम गजरात प्रस्थान होणार आहे. यासाठी आळंदीतील (Alandi Wari) विविध शासकीय खात्यांसह आळंदी देवस्थानमध्ये भाविक, वारकरी यांचे सेवा सुविधा देण्याचे तयारीने आळंदीत विविध आघाड्यावर वेग घेतला आहे.
माऊलींचे आषाढी पायी वारीचा प्रस्थान सोहळा अनुभवण्यासह नेत्रात साठविण्यासाठी राज्य परिसरातून लाखो भाविक हरिनाम गजर करत दिंड्या-दिंड्यातून आळंदीत दाखल होत असतात. यावर्षीही अधिकचे भाविक यात्रेत सहभागी होणार असल्याचा अंदाज वर्तविण्यात आला असून त्याप्रमाणे आळंदी प्रस्थान काळात आलेल्या भाविकांसह स्थानिक नागरिकांना देखील गैरसोयीस सामोरे जावे लागू नये यासाठी नियोजन प्रमाणे तयारी केली जात आहे. यासाठी आळंदी नगरपरिषद, आळंदी देवस्था, आळंदी पोलीस, महसूल यंत्रणा आणि स्थानिक ग्रामस्थ यांना विश्वासात घेऊन नियोजन केले जात आहे.
प्रस्थान काळात मंदिर परिसर, इंद्रायणी नदी घाट, प्रदक्षिणा मार्ग तसेच अधिक वर्दळीची ठिकाणे येथे प्रभावी बंदोबस्त तैनात केला जाणार आहे. यासाठी नियोजन करण्यात आले असून भाविक आणि नागरिकांच्या सुरक्षिततेस प्राधान्य देण्यात आले आहे. याशिवाय प्रस्थान यात्रा काळात आळंदीत वाहतुकीची कोंडी होऊ नये यासाठी भाविक, वारकरी, स्थानिक नागरिक, कामगार यांची वाहने पास पाहून सोडली जाणार आहेत. इत्तर सर्व प्रकारच्या वाहनांना ७ ते १२ जून या काळात आळंदीत पूर्णपणे बंदी राहणार आहे.
आळंदीत भाविकांची गर्दी होऊ लागली असून, तीर्थक्षेत्रात मठ, मंदिर, धर्मशाळा आणि शाळेच्या मैदानासह इंद्रायणी नदी लगत धर्मशाळांत भाविक – वारकऱ्यांच्या विना, टाळ-मृदंगाचा त्रिनाद आणि नामजयघोष, हरिनामाचा गजर होताना दिसत आहे. परंपरेने सप्ताह सुरु झाला असून, हरिनाम गजर धार्मिक कार्यक्रम सुरु झाले आहेत.