आळंदी : माऊलींचे पालखी रथास बैलजोडीची 2023 पालखी सोहळ्यास यावर्षीची सेवा देण्याचा मान येथील ज्येष्ठ नागरिक तुळशीराम भोसले (Tulshiram Bhosale) आणि त्यांचे पुतणे रोहित भोसले (Rohit Bhosale) यांच्या बैलजोडीस देण्याचा निर्णय घेण्यात आला. तसे आळंदी देवस्थानला कळविण्यात आले आहे, अशी माहिती श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थान समितीचे व्यवस्थापक ज्ञानेश्वर वीर (Dnyaneshwar Veer) यांनी दिली.
ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा 2023 साठी श्रींचे वैभवी पालखी रथास बैलजोडी सेवा देण्यासाठी निवड समितीची बैठक झाली. श्रींचे पालखी सोहळ्याचे आळंदी मंदिरातून जूनमध्ये प्रस्थान होणार आहे. यासाठी श्रींचे पालखी रथास बैलजोडी सेवा पुरविण्याचा मान येथील ग्रामस्थ तुळशीराम भोसले आणि त्यांचे पुतणे रोहित भोसले यांचे परिवारातील कुटुंबीयांस रोटेशनने देण्याचा निर्णय घेत जाहीर करण्यात आला.
सेवेसाठी यावर्षी भोसले घराण्यास रोटेशन ने संधी मिळत आहे. यासाठी आळंदी देवस्थानाकडे माजी नगरसेवक डी.डी.भोसले पाटील, नगारखान्याचे मानकरी बाळासाहेब दगडू भोसले, निलेश भोसले, रोहित भोसले, तुळशीराम भोसले, उत्तम भोसले, पांडुरंग भोसले असे सात अर्ज भोसले कुटुंबियांकडून देण्यात आले होते. या आलेल्या अर्जावर संबंधितां समवेत चर्चा करीत सुसंवाद साधून बैलजोडी सेवा देण्याचे मानकरी यांचे नावावर शिक्कामोर्तब करण्यात आला.
आळंदीतील ज्येष्ठ नागरिक तुळशीराम भोसले आणि त्यांचे पुतणे रोहित चंद्रकांत भोसले यांना यावर्षीची सेवा परंपरेने देण्यात आली. समितीचे पदाधिकारी यांनी घेतलेला निर्णय मानकरी यांचे नावाची शिफारस करून ठराव मंजूर करण्यात आला आहे. या बैठकीत निवड समितीने सर्वानुमते भोसले कुटुंबियांकडून प्राप्त अर्जावर निर्णय घेत आळंदी देवस्थानला कळविले असल्याचे व्यवस्थापक ज्ञानेश्वर वीर यांनी सांगितले.