Ladki Bahin Yojna News: रक्षाबंधनाच्या निमित्ताने ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण’ योजनेचा जुलै महिन्याचा हफ्ता लाभार्थी महिलांच्या खात्यात जमा करण्यास सुरूवात झाली आहे. अनेक महिलांच्या खात्तात पैसेही जमा होऊ लागले आहेत. गेल्या वर्षी विधानसभा निवडणुकीपूर्वी राज्य सरकारने ही योजना महिलांसांठी सुरू केली होती. त्यानुसार राज्यातील महिलांना १५०० रुपये दिले जातात.
पण अशातच सातारा जिल्ह्यातील काही महिलांनी रक्षाबंधनाच्या निमित्ताने लाडक्या बहिणींचे १५०० रुपये देण्याऐवजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे एक वेगळीच मागणी केली आहे. इतकेच नव्हे तर, त्यांनी त्यांच्या रक्ताने पत्र लिहीत त्यांची मागणी मुख्यमंत्र्यांकडेकेली आहे. महिलांना रक्ताने लिहिलेल्या पत्रात मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे वाई तालुक्यातील बेकायदेशीर खाणी बंद करण्याची मागणी केली आहे. वाईच्या लाडक्या बहिणींनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना रक्ताने पत्र लिहिले आहे.
महिलांनी त्यांच्या पत्रात, सातारा जिल्ह्यात गेल्या अनेक वर्षांपासून सुरू असलेल्या बेकायदेशीर दगड फोडण्याच्या खाणींकडे लक्ष वेधले आहे. अवैध खाणींमुळे वाई तालुक्यातील हवेत वाढती धूळ आणि प्रदूषणाचा मुद्दा बहिणींनी उपस्थित केला आहे. खाणींमुळे प्रदूषित होणारी हवा स्थानिक लोकांच्या आरोग्याला हानी पोहोचवत आहे. लोकांमध्ये श्वसन, त्वचा आणि इतर आरोग्यविषयक विकार वाढत आहेत. खाणकामामुळे जवळच्या जलसाठ्यांमध्ये गाळ किंवा रासायनिक प्रदूषण होण्याची शक्यता आहे. स्थानिक लोकांनी याविरोधात निषेध नोंदवला आहे आणि क्रशर परवाना रद्द करण्याची मागणी केली आहे.
वारंवार आंदोलन करूनही ही समस्या सुटत नाही, दगड फोडणाऱ्या खाणी बंद करण्याची विनंती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना करावी अशी मागणी प्रिय भगिनींनी केली आहे. मुख्यमंत्र्यांना रक्ताने पत्र लिहिण्याव्यतिरिक्त, गेल्या २२ दिवसांपासून वाई ते मुंबई मंत्रालय असा लाँग मार्च काढला जात असल्याचे सांगण्यात येत आहे. वाई तालुक्यात बेकायदेशीरपणे चालणारे दगड खाण क्रशर बंद करण्याची मागणी करत हा लाँग मार्च काढण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर, लाडक्या बहिनींनीदेवेंद्र फडणवीस यांना रक्ताने पत्र लिहून रक्षाबंधनाला बेकायदेशीर क्रशर बंद करण्याची मागणी केली आहे. वाईच्या महिलांनी भावनिक आवाहन केले आहे आणि लिहिले आहे की रक्षाबंधनाच्या दिवशी आम्हाला १५०० रुपयांची भेट देऊ नका, तर क्रशर बंद करून आम्हाला न्याय द्या, असंही त्यांनी म्हटलं आहे.