कल्याण : कल्याण पूर्वेतील (Kalyan East) ड प्रभाग समिती कार्यालयाच्या परिसरात उभे राहात असलेले डॉ. बाबासाहेब आंबडेकर स्मारकाचे (Dr Babasaheb Amdekar Memorial) काम अंतिम टप्प्यात आहे. येत्या काही महिन्यात स्मारकाचे काम पूर्ण होणार असून पुढील वर्षी येणारी डॉ. बाबासाहेब आंबडेकरांची जयंती (Dr. Babasaheb Amdekar Birth Anniversary) स्मारकात अधिक भव्य स्वरूपात साजरी केली जाईल, असे प्रतिपादन कल्याण लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे (MP Dr Shrikant Shinde) यांनी केले. डॉ. बाबासाहेब आंबडेकर यांच्या जयंती निमित्त कल्याण पूर्व येथील विजय नगर (Vijay Nagar) परिसरात एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते.
कल्याण पूर्व येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा एक भव्य पुतळा असावा अशी मागणी येथील स्थानिक रहिवाशांकडून मागील अनेक वर्षांपासून केली जात होती. नागरिकांच्या याच मागणीचा विचार करत खासदार डॉ. शिंदे यांनी पुढाकार घेत मागील दोन वर्षांपूर्वी स्मारकाच्या उभारणीचे काम हाती घेतले होते. या स्मारकासाठी लागणाऱ्या जागेचा प्रश्न उद्भवला होता. उपलब्ध असलेली जागा आरक्षित असल्याने त्याची शासकीय प्रक्रिया करून आरक्षणात फेर बदल करणे महत्वाचे होते.
यासाठी खासदार डॉ. शिंदे यांनी पुढाकार घेत विक्रमी वेळेत आरक्षणात फेर बदल करण्यात आले. या आरक्षण फेरबदलांनंतर अवघ्या तीन महिन्यात १६ मार्च २०२२ रोजी स्मारक उभारणीसाठी एकूण ८ कोटी रुपयांची निविदा जाहीर झाली. तसेच स्मारक अधिक भव्य पद्धतीने उभारावे यासाठी खासदार डॉ.शिंदे यांनी राज्याचे विद्यमान मुख्यमंत्री आणि तत्कालीन नगरविकास विभागाचे मंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे स्मारकासाठी अतिरिक्त ५ कोटी रुपयांच्या निधीची नगरविकास खात्याकडे मागणी केली होती. नगरविकास विभागाकडूनही यासाठी तात्काळ मंजुरी देण्यात आली होती.
या सर्व गोष्टींनंतर १२ एप्रिल २०२२ रोजी स्मारक उभारणीचा भूमिपूजन भव्य सोहळा संपन्न झाला होता. एकूण १३ कोटी रूपये खर्चातून उभे राहत असलेल्या या स्मारकाचे आता अंतिम टप्प्यात आले आहे. डॉ. बाबासाहेब आंबडेकर यांच्या जयंती निमित्त खासदार डॉ. शिंदे यांनी शुक्रवारी मध्यरात्री डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करत स्मारक परिसरात भेट दिली. यावेळी त्यांनी उपस्थित असलेल्या सर्व नागरिकांना जयंतीच्या शुभेच्छा देत त्यांच्याशी संवाद साधला. यानंतर प्रभागात उभारण्यात येत असलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या भव्य स्मारकाची पाहणीही केली.
यावेळी नागरिकांशी संवाद साधताना त्यांनी स्मारकाचे काम लवकरच पूर्ण होणार असल्याचे सांगितले. सर्व नागरिकांनी स्मारकासाठी दाखवलेल्या एकीचा हा विजय आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी केलेल्या संघर्षाची पुढील पिढ्यांना माहिती व्हावी, यासाठी स्मारकाची उभारणी केली आहे. या स्मारकाला भेट देणारा व्यक्ती येथून प्रेरणा, ऊर्जा आणि सकारात्मकता घेऊन बाहेर पडणार आहे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना स्मारकाच्या रूपाने मानवंदना देण्याचा प्रयत्न करत आहोत. स्मारकाचे काम अंतिम टप्प्यात असून पुढील जयंती स्मारकात साजरी होईल, असे त्यांनी यावेळी उपस्थितांनाआवर्जून सांगितले. याप्रसंगी हिंगोली लोकसभा मतदारसंघाचे खासदार हेमंत पाटील, जळगाव लोकसभा मतदारसंघाचे खासदार उन्मेष पाटील, कल्याण पूर्वचे आमदार गणपत गायकवाड यांच्यासह शिवसेनेचे स्थानिक पदाधिकारी, कार्यकर्ते आणि मोठ्या संख्येने भीम बांधव उपस्थित होते.
– कल्याण पूर्वेतील प्रभाग ड मध्ये १ हजार ३०० चौरस मीटर जागेवर भव्य स्मारक
– डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा भव्य पुतळा
– डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या दुर्मिळ चित्रांचे प्रदर्शन
– स्मारकांच्या भिंतींवर ३ डी चित्र
– ग्रंथालय
– डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा जीवनपट उलगडून दाखवणारा होलोग्राम आणि लाईट शो
– सांस्कृतिक समारंभासाठी स्मारक परिसरात भव्य सभागृह