Malatpur Arogya Kendra: जिल्हा परिषदेच्या पहिल्याच बैठकीत मांडणार मालतपूरचा प्रश्न; डॉ. प्रिया शिंदे यांचा वाईकरांना शब्द
“वाई तालुक्याच्या पश्चिम भागातील जनतेने आपल्या जमिनींचा त्याग केल्यामुळेच धोम आणि बलकवडी सारखी विशाल धरणे उभी राहिली. या धरणांमुळे पूर्व भागातील हजारो एकर जमीन ओलिताखाली आली, मात्र याच दुर्गम भागात आजही सुसज्ज आरोग्य केंद्र उपलब्ध नाही, याची आपल्याला मोठी खंत वाटते. जिल्हा परिषदेच्या पहिल्याच बैठकीत मालतपूर प्राथमिक आरोग्य केंद्राचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी आपण विशेष प्रयत्न करू,” असे ठाम अभिवचन सातारा जिल्हा परिषदेच्या नूतन अध्यक्षा डॉ. प्रिया शिंदे यांनी दिले.
वाई तालुक्यातील वासोळे येथे काळूबाई सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ, नवघणेवाडी यांच्या वतीने आयोजित दोन दिवसीय रामनवमी सप्ताह कार्यक्रमात डॉ. प्रिया शिंदे यांचा सत्कार करण्यात आला. या सत्काराला उत्तर देताना त्या बोलत होत्या. याप्रसंगी माजी जिल्हा परिषद अध्यक्षा सौ. अरुणादेवी पिसाळ, युवानेत्या ॲड. दीप्ती पिसाळ, रोहित वाडकर, जितेंद्र पिसाळ, अशोक मांढरे, अभेपुरीच्या सरपंच सौ. सारिका मांढरे, उपसरपंच विजय मांढरे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
Mira-Bhayandar News: मिरा-भाईंदर महापालिकेत लोकशाहीचा गळा आवळला?
डॉ. प्रिया शिंदे म्हणाल्या की, “पश्चिम भागातील सामान्य जनतेचे प्रश्न सोडवणे ही आपली प्राथमिकता असेल. सामान्य माणसाला विकासाचा केंद्रबिंदू मानूनच आमची वाटचाल सुरू राहणार आहे. वासोळे येथील समाजमंदिर, रस्ते आणि पुलांच्या कामांसाठी ग्रामस्थांनी प्रस्ताव सादर करावेत. वाई तालुक्याच्या विकासकामांसाठी निधीची कमतरता भासू देणार नाही,” अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली. यावेळी उपस्थित मान्यवरांनीही डॉ. प्रिया शिंदे यांच्या निवडीबद्दल आनंद व्यक्त केला असून, त्यांच्या नेतृत्वाखाली जिल्ह्याचा आणि विशेषतः वाई तालुक्याचा विकास झपाट्याने होईल, असा विश्वास व्यक्त केला.
माजी जिल्हा परिषद अध्यक्षा अरुणादेवी पिसाळ म्हणाल्या, डॉ. प्रिया शिंदे यांच्याकडे जनसेवेचा वारसा आहे.त्यांच्याकडे विकासाची निश्चित दृष्टी आहे.केंद्र सरकार,राज्य शासन आणि जिल्हा परिषदेतील सत्ताधारी ‘भाजप’ पश्चिम भागातील विविध अडचणी सोडवण्यासाठी सज्ज झाला आहे.” तर रोहित वाडकर म्हणाले “आमचा भाग अतिदुर्गम असून येथील लोकांच्या त्यागामुळेच पश्चिम महाराष्ट्रातील दुष्काळी भागात शेती फुलली आहे. मात्र, आमचे प्रश्न आजही प्रलंबित आहेत,” अशी खंत व्यक्त केली. तसेच पुनर्वसित नागरिकांप्रमाणेच पश्चिम भागालाही पालकत्व मिळावे, अशी मागणी त्यांनी केली.
Jyoti Waghmare : गारपिटीनंतर डॉ. ज्योती वाघमारे शेतकऱ्यांच्या बांधावर
यावेळी अभेपुरी येथील मंदिर व चावडीचे उद्घाटन डॉ. प्रिया शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले. अभेपुरी येथील चावडीचे लोकवर्गणीतून नूतनीकरण करण्यात आले असून त्याचे लोकार्पणही यावेळी पार पडले. यावेळी वासोळे, धोम व पश्चिम भागातील विविध गावांतील ग्रामस्थ, वारकरी संप्रदायातील सदस्य आणि मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. दिवंगत मदनराव पिसाळ यांच्यावर पश्चिम भागातील जनतेने जीवापाड प्रेम केले.अप्पांना सलग २० आमदार बनविण्यात या भागाचा सिंहाचा वाटा होता,आम्ही पिसाळ कुटूंबीय कायमच या भागाच्या विकासासाठी प्रयत्नशील राहू असे अभिवचन देत युवा नेत्या दीप्ती पिसाळ यांनी वासोळे येथील समाज मंदिरासाठी ₹२५,००० ची देणगी जाहीर केली.






