गारपिटीनंतर डॉ. ज्योती वाघमारे शेतकऱ्यांच्या बांधावर; तातडीने पंचनाम्यांचे प्रशासनाला निर्देश
येवती-पापरी आणि पेनूर परिसरात झालेल्या वादळी वाऱ्यासह गारपिटीने शेतकऱ्याच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावला आहे. द्राक्ष बागा, केळी, आणि इतर नगदी पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून, अनेक ठिकाणी गोठे आणि घरांचीही पडझड झाली आहे. अनेक शेतकऱ्यांनी आपल्या व्यथा मांडताना खासदारांसमोर अश्रूंना वाट मोकळी करून दिली.
परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन डॉ. ज्योती वाघमारे यांनी घटनास्थळावरूनच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि महसूल राज्यमंत्री योगेश कदम यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधला. मोहोळ तालुक्यातील या नैसर्गिक आपत्तीची माहिती देत त्यांनी शासनाकडून तातडीने मदतीची मागणी केली आहे. तसेच उपस्थित असलेल्या कृषी अधिकारी, तलाठी आणि मंडळ अधिकारी यांना त्वरित पंचनामे पूर्ण करण्याच्या कडक सूचना दिल्या, जेणेकरून एकही बाधित शेतकरी मदतीपासून वंचित राहणार नाही.
या दौऱ्याप्रसंगी शिवसेना जिल्हाप्रमुख व जिल्हा परिषद सदस्य चरणराज चवरे, मोहोळचे माजी नगराध्यक्ष रमेश बारस्कर, नगरसेवक तथा युवा सेना जिल्हाप्रमुख प्रियदर्शन साठे, भीम वाघमारे, दीपक पाटील यांच्यासह संबंधित कृषी अधिकारी, तलाठी, मंडळ अधिकारी, शिवसैनिक आणि परिसरातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
“शेतकऱ्यांचे नुकसान पाहून मन हेलावले आहे. केवळ पंचनामे करून न थांबता, नुकसानभरपाई प्रत्यक्ष शेतकऱ्यांच्या पदरात पडेपर्यंत पाठपुरावा करेन. उपमुख्यमंत्री महोदयांनी देखील सकारात्मक प्रतिसाद दिला असून लवकरच दिलासादायक निर्णय होईल.”, अशी प्रतिक्रिया डॉ. ज्योतीताई वाघमारे यांनी दिली.






