सणासुदीत गोडतेल आणखी महागणार
अमरावती : राज्यातील लाखो महिलांना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळाल्याने समाधान व्यक्त केले जात आहे. ग्रामीण तथा शहरी भागात रोजगाराची वाणवा असताना ही योजना लाभदायक ठरत आहे. मात्र, ऐन नवरात्र, दसरा व दिवाळी सणाच्या तोंडावर खाद्यतेलाच्या दरवाढीने सर्वसामान्य गृहिणींचे बजेट पुरते कोलमडले आहे. परिणामी, सण साजरा करताना हात आवरता घ्यावा लागणार आहे.
सणासुदीच्या तोंडावर खाद्यतेलाच्या बाजारात तेजी निर्माण झाली आहे. केंद्र सरकारने कच्च्या तेलावरील आयात शुल्क वाढविल्याने खाद्यतेलाच्या किमतीही वाढल्या आहेत. सर्वाधिक वापरले जाणारे सोयाबीन तेल तथा इतरही खाद्यतेलाचे भाव लिटरमागे 30 ते 35 रुपयांनी वधारल्याचे पाहायला मिळत आहे.
महागाईत होरपळणाऱ्या सर्वसामान्य नागरिकांना दिलासा देण्यासाठी केंद्र सरकारने गतवर्षी कच्च्या तेलावरील आयात शुल्क रद्द केले होते. त्यामुळे गगनाला भिडणाऱ्या खाद्यतेलाच्या किमती हळूहळू खाली घसरल्याने गृहिणींसह हॉटेलचालकांना दिलासा मिळाला होता. जवळपास वर्षभरापासून खाद्यतेलाच्या किमती स्थिर होत्या. मात्र, दरवर्षी सणासुदीत तेलाची मागणी प्रचंड वाढते. त्यामुळे या किमती वाढल्याचे सांगितले जात आहे.