आगीचा धोका टाळण्यासाठी विद्युत यंत्रणेचा कायापालट! रुग्ण सुरक्षिततेसाठी पालिकेचे अत्यंत महत्त्वाचे पाऊल
Mumbai News: मुंबई बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या परळ येथील प्रसिद्ध राजे एडवर्ड स्मारक म्हणजेच केईएम रुग्णालयातील आगीचा धोका रोखण्यासाठी आणि रुग्ण सुरक्षिततेसाठी पालिकेने अत्यंत महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. रुग्णालयाच्या मुख्य इमारतीमधील जुनी व धोकादायक झालेली संपूर्ण विद्युत यंत्रणा बदलण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला असून, यासाठी सुमारे १० कोटी ३० लाख ८७ हजार ७५० रुपयांचा सुधारित खर्चाचा प्रस्ताव अंतिम मंजुरीसाठी स्थायी समिती तसेच स्थापत्य समितीपुढे सादर केला आहे. केईएम रुग्णालयात २२ नोव्हेंबर २०१९ रोजी घडलेल्या विद्युत अपघातात प्रिन्स राजभर या बालकाचा मृत्यू झाला होता. याशिवाय दहिसर जकात नाका येथील उपचार केंद्र, ठाणे आणि भंडारा येथील रुग्णालयांमधील आगीच्या दुर्घटनांच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने ही खबरदारी घेतली आहे.(फोटो सौजन्य – AI)
या कामाचा प्रत्यक्ष कंत्राट खर्च ९ कोटी ३७ लाख १६ हजार १३६ रुपये निश्चित करण्यात आला आहे. याशिवाय १० टक्के पर्यवेक्षण खर्चासह एकूण अंदाजित खर्च १० कोटी ३० लाख ८७ हजार ७५० रुपये इतका असून, यासाठी सन २०२६-२७च्या सुधारित अर्थसंकल्पात आवश्यक निधीची तरतूद करण्यात येणार आहे.
केईएम रुग्णालय हे १८०० खाटांची क्षमता असलेले अग्रगण्य वैद्यकीय केंद्र असून केंद्र सरकारच्या राष्ट्रीय दुर्मीळ आजार धोरण २०२१ अंतर्गत नियुक्त केलेल्या देशभरातील ८ उत्कृष्टता केंद्रांपैकी एक आहे. येथे दरवर्षी सुमारे १८ लाख बाहारुग्ण आणि ८५ हजार आंतररुग्ण उपचारासाठी येतात. सुमारे ३९० डॉक्टर, ५५० निवासी डॉक्टर आणि वैद्यकीय विद्यार्थी व कर्मचारी २४ तास कार्यरत असतात. या गजबजलेल्या संवेदनशील ठिकाणी शॉर्टसर्किटमुळे होणारे अपघात टाळण्यासाठी या प्रस्तावाला लवकरच अंतिम मंजुरी मिळण्याची शक्यता आहे.
लालबागच्या राजाच्या प्रसादाने उजळणार BMC हॉस्पिटल्स; काय आहे नेमकी योजना? जाणून घ्या संकल्पना
रुग्णालयात आग प्रतिबंधक सुरक्षित वातावरण निर्माण करणे आणि शासकीय सुरक्षा मानकांचे काटेकोर पालन करणे आवश्यक असल्याने पालिकेच्या यांत्रिकी व विद्युत विभागाने हा प्रस्ताव तयार केला आहे. या कामासाठी पालिकेने मागविलेल्या संगणकीय निविदा प्रक्रियेत चार पुरवठादारांनी सहभाग घेतला होता. त्यातील दोन पात्र निविदाकारांपैकी ‘मेसर्स एलिप्रोज इंजिनीअर्स’ यांनी पालिकेच्या कार्यालयीन अंदाजापेक्षा १.९३ टक्के कमी दराची निविदा सादर केल्याने त्यांची या कामासाठी निवड करण्यात आली आहे.






