Drug Mafia Lalit Patil Case
पुणे : ससूनमधून पलायन केल्याप्रकरणी ड्रग्ज माफिया ललित पाटील याला पुणे पोलिसांनी अटक केली. त्याला न्यायालयात हजर केले असता ७ दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. तत्पूर्वी ललित पाटील पलायनप्रकरणात पोलिसांनी त्याचा वाहनचालक तसेच ससूनमधील शिपाई, कारागृहाचा कर्मचारी व कॉन्सिलर यांना नुकतीच अटक केली. सध्या ते पोलीस कोठडीत असून, त्यांच्याकडे चौकशी सुरू करण्यात आली आहे.
ललित पाटीलसह एकूण १४ जणांना अटक
पुणे पोलिसांनी गुन्हे शाखेने ससून रुग्णालयातून चालविले जात असलेले ड्रग्ज रॅकेट उघड करून ललित पाटीलसह एकूण १४ जणांना ड्रग्ज रॅकेटप्रकरणात अटक केली आहे. मात्र, पोलिसांच्या कारवाईनंतर दुसऱ्या दिवशी ललित पाटील ससून रुग्णालयातून पळून गेला होता. पळून जातेवेळी तसेच त्यानंतरच्या कालावधीत त्याला मदत करणाऱ्यांचा शोध आता पोलिसांकडून घेतला जात आहे. पोलिसांनी यापुर्वी ११ जणांना अटक केली होती. त्यानंतर नुकतीच ससूनमधील शिपाई महेंद्र शेवते, कारागृहाचा कर्मचारी मोईस शेख आणि त्यानंतर समुपदेशक सुधाकर सखाराम इंगळे (वय ४४) यांना अटक केली.
ललितला मोबाईल दिला व तो आरोपींच्या संपर्कात
दरम्यान, मोईस याने ललितला मोबाईल दिला व तो आरोपींच्या संपर्कात होता, असे समोर आले. तर, अमली पदार्थ तस्कर अभिषेक बलकवडे याने इंगळे याला पैसे दिल्याचे उघड झाले आहे. तसेच, ललित ससूनमध्ये असताना इंगळे त्याच्याशी आणि भूषण पाटीलदेखील संपर्कात होता, असा दावा पोलिसांनी न्यायालयात केला.
सचिन वाघलाही अटक
ललित पाटील ससून रुग्णालयातून पसार झाल्याच्या प्रकरणात त्याचा चालक सचिन वाघ याला पुणे पोलिसांनी ऑर्थर रोड कारागृहातून ताब्यात घेतले. वाघला मुंबई पोलिसांनी बंगळुरू येथे ललितसोबत अटक केली होती. सचिन हा मूळचा नाशिकचा आहे. ससूनमधून ललित पळून गेल्यानंतर वाघने त्याला मदत केली. त्यामुळे याप्रकरणात न्यायालयात प्रोडक्शन वॉरंट सादर करून पुणे पोलिसांनी वाघचा ताबा घेऊन अटक केली. त्याला न्यायालयाने २ डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.