पुणे : सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानुसार राज्य निवडणूक आयोगास ओबीसी आरक्षणाशिवाय स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जाहीर करण्याचे आदेश कोर्टाने दिले आहेत. सर्वप्रथम सन्माननीय सुप्रीम कोर्टाचा आम्ही आदर करतो. अर्थात अशा प्रकारचा निर्णय होणे राष्ट्रवादी कांग्रेस पार्टीला अपेक्षित नव्हते. महाराष्ट्रातील ओबीसी बांधवांना त्यांच्या हक्काचे आरक्षण मिळालेच पाहिजे, ही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची आग्रही भूमिका होती, आहे आणि यापुढेही राहील. ओबीसी बांधवांना निवडणुकीतील राजकीय आरक्षण मिळावे यासाठी आमची सुरू असणारी लढाई यापुढे देखील सुरूच राहणार आहे. अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेसचे पुणे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी दिली.
पुढे ते म्हणाले, कोर्टाच्या निर्णयाचा मान राखत असताना निवडणुका कधी घ्यायच्या याबाबतचे सर्व अधिकार राज्य निवडणूक आयोगाचे आहेत. अशा परिस्थितीत निवडणूक आयोगाने तत्काळ निवडणुका जाहीर केल्या, तर पुणे शहर राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी सज्ज आहे. असंही जगताप म्हणाले.
[read_also content=”देवेंद्र फडणवीस सध्या ‘गजनी’तील आमीर खानसारखे… https://www.navarashtra.com/maharashtra/devendra-fadnavis-is-currently-like-aamir-khan-in-ghajini-nrdm-276428.html”]
प्रशांत जगताप म्हणाले, कोर्टाने जरी ओबीसी आरक्षणाशिवाय निवडणुका घेण्याचे जाहीर केले असले तरी, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वरिष्ठ नेत्यांच्या आदेशानुसार पुणे शहरात राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी तिकीट वाटपात ओबीसी बंधु भगिनींना सर्वसाधारण कोट्यातून त्यांच्या वाट्याची तिकिटे देणार आहेत. ओबीसी बांधवांवर कुठल्याही प्रकारचा अन्याय होऊ न देण्याची काळजी राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी घेईल.