शेतकऱ्यांवर पुन्हा संकट; मजुराचा जाणवतोय मोठा तुटवडा
पारगाव शिंगवे : आंबेगाव तालुक्यात पहिल्या टप्प्यातील कांदा पिकांच्या काढणीला सुरुवात झाली आहे. कांदा काढण्यासाठी शेतकऱ्यांना मजुराचा तुटवडा निर्माण झाला आहे. त्याचबरोबर अवकाळी पाऊस सावट आणि बाजारभाव समाधानकारक मिळत नसल्याने कांदा उत्पादक शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.
तालुक्याच्या पूर्व भागात पहिल्या टप्प्यातील कांदा काढण्यासाठी शेतकऱ्यांना मजूर मिळत नसल्याने शेतकऱ्यांना मोठी धावपळ करावी लागत आहे. तसेच अवकाळी पावसाचे सावट असून, काही दिवसांपूर्वी काही ठिकाणी अवकाळी पावसाने हजेरी लावली होती. शेतातील कांदा काढणीसाठी बीड जिल्ह्यातील मजूर उपलब्ध होत असून, साखर कारखान्याचे गळीत हंगाम संपले आहे. ऊसतोड मजुरांना आपल्या गावाकडे रोजगार मिळत नसल्याने गावाकडे न जाता कारखाना परिसरात मुक्कामी असून, तालुक्यात या मजुरांना शेतात कांदा काढणी व अन्य शेतीची कामे मिळत आहेत. या मजुरांना बागायती क्षेत्रात रोजगार मिळत आहे.
तीन महिन्यानंतर हे मजूर आपल्या गावाकडे जाणार आहेत. तसेच कांदा काढणी जुन्नर तालुक्यातील मावळेही उपलब्ध होत आहेत. परंतु, गावोगावी सर्वत्र कांदा काढणी सुरु असल्याने कांदा काढणीसाठी मजुरांचा तुटवडा जाणवत आहे. बागायती परिसर असल्याने व ऊसाचे क्षेत्र असल्याने या परिसरात बिबट्याचा वावर मोठ्या प्रमाणात आहे. यामुळे शेतात कांदा काढणीसाठी महिलांमध्ये भीतीचे वातावरण आहे.
नवीन काढून झालेल्या कांद्याला समाधानकारक बाजारभाव मिळत नसल्याने तसेच आखाती देशामध्ये युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाल्याने हा कांदा आखाती देशात पाठवता येत नाही. या कांद्याला बाजार भाव मिळत नसल्याने शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झालेले आहे. तसेच अनेक शेतकरी कांदा काढून हा कांदा चार-पाच -सहा दिवस शेतात मुरून देऊन मग तो कांदा बराखीत साठवण्यात येतो. भविष्यात चांगला बाजारभाव मिळेल या आशेवर कांदा बराकीत साठवण्यात येतो, असे शेतकरी माऊली ढोबळे यांनी सांगितले.
यंदाचा हंगाम शेतकऱ्यांसाठी ठरतोय चिंतेचा
दुसरीकडे, जुन्नर तालुक्यातील ओतूर, रोहोकडी आणि लगतच्या परिसरात सध्या उन्हाळी कांदा काढणीच्या कामांनी वेग घेतला आहे. मात्र, यंदाचा हंगाम शेतकऱ्यांसाठी आनंदाचा ठरण्याऐवजी चिंतेचा ठरत आहे. एकीकडे हवामानातील बदलांशी झुंज देत कष्टाने पिकवलेला कांदा हातात आला असताना, दुसरीकडे परप्रांतीय मजुरांच्या तुटवड्यामुळे आणि स्थानिक मजुरांच्या वाढत्या दरामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे.
हेदेखील वाचा : शेतकऱ्यांच्या चिंतेत वाढ ! उन्हाळीस ९४९ रुपये, तर लाल कांद्याच्या बाजारभावात ५०० रुपयांची घसरण






