सेलू : तालुक्यातील दहेगाव पोलीस ठाण्याअंतर्गत येणाऱ्या हमदापूर येथे बुधवारी ११ मे रोजी दुपारी पित्यानेच स्वतःच्या अल्पवयीन मुलीच्या प्रेम प्रकरणामुळे झालेल्या वादात लाकडी वस्तूने मुलीच्या डोक्यावर गंभीर वार करून हत्या केली. या घटनेने परिसरात खळबळ निर्माण झाली असून, आरोपी पिता विलास पांडुरंग ठाकरे ह्याला पोलिसांनी अटक केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार आरोपीच्या मुलीचे गावातीलच एका युवकाशी प्रेमसंबंध होते. यावरून आरोपी पिता आणि मृतक अल्पवयीन मुलगी यांच्यात नेहमी वाद-विवाद होत असत. आज घरी स्वयंपाकाची चव बिघडल्यावरून आरोपी आणि मुलीमध्ये वाद झाला होता, अशी माहिती मिळाली. हा वाद बुधवारी ११ मे ला विकोपाला गेला आणि हत्येचा गुन्हा घडला.
दहेगाव पोलिसांना या घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी दाखल होत पंचनामा करून आरोपी पिता विलास ठाकरेला अटक करण्यात आली आहे. घटनास्थळी अप्पर पोलीस अधीक्षक यशवंत सोळंके, उपविभागीय पोलीस अधिकारी पीयूष जगताप, दहेगांव पोलीस ठाण्याचे ठाणेदार चकाटे यांच्यासह चमू दाखल झाली. दहेगाव पोलीस पुढील तपास करत आहेत.