माढा तालुक्यातील कन्हेरगावात बिबट्याची दहशत (फोटो - सोशल मीडिया)
टेंभुर्णी : माढा तालुक्यातील कन्हेरगाव परिसरात गेल्या चार महिन्यांपासून बिबट्याचा वावर असल्याचा प्रत्यय येत आहे. कन्हेरगाव येथे काही ठिकाणी ग्रामस्थांना बिबट्याचे दर्शन झाले. कन्हेरगाव शिवारातील सीना-माढा उपसा सिंचनच्या रस्त्यावर व शिवाजी मोरे यांच्या शेतात व महादेव काळे, रामलिंग केदार यांच्या वस्तीजवळ बिबट्या दिसल्याने ग्रामस्थ भयभीत झाले आहेत. वन विभागाने बिबट्याचा ताबडतोब बंदोबस्त करावा, अशी मागणी शेतकरी, ग्रामस्थांतून होत आहे.
कन्हेरगाव येथील रामलिंग बापू केदार यांच्या वस्तीवर रात्री अकरा वाजता बिबट्याने देशी गाईच्या कालवडावर झडप घालून जखमी केले. जनावरांच्या ओरडण्याच्या आवाजाने केदार कुटुंबिय जागे झाले. ते बाहेर आल्यानंतर बिबट्या तेथून पळून गेला. यामुळे पुढील अनर्थ टळला. सायंकाळी सातच्या दरम्यान काळे व मोरे यांच्या शेताच्या बांधावर केळीच्या बागे शेजारून बिबट्या जात असताना काही शेतकरऱ्यांना बिबट्या दिसला. कन्हेरगावचे माजी उपसरपंच धनंजय मोरे यांनी वनविभागाचे कर्मचारी वनसेवक विकास नागनाथ डोके यांना फोनवरून ही माहिती देताच वनसेवक डोके हे पाच मिनिटात तेथे आले.
हेदेखील वाचा : Employment in Port Sector: महाराष्ट्रातील तरुणांसाठी आनंदाची बातमी; बंदर क्षेत्रात रोजगार निर्मिती, ITI संस्थांचे आधुनिकीकरण
दरम्यान, वनसेवक विकास डोके त्याठिकाणी आल्यानंतर बिबट्या रस्ता ओलांडून जाताना त्यांच्यासह अनेकांनी पाहिला. यामुळे डोके यांनीही गावात बिबट्या असल्याच्या वृत्तास दुजोरा दिला आहे.
बिबट्या शिरला घरात
दुसऱ्या एका घटनेत, काही दिवसांपूर्वी कुत्र्याचा पाठलाग करत असताना एक बिबट्या पडक्या घरातील भिंतीवरून खाली पडला. साखरझोपेत असलेल्या घरातील व्यक्तींमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. हा प्रकार जुन्नर तालुक्यात घडला. यावेळी आईच्या उशाला बिबट्या पडल्याचे पाहून मुलाने बिबट्याशी झुंज करत त्याला घरातून पिटाळले. त्यामुळे पुढील अनर्थ टळला. ‘काळ आला होता पण वेळ नाही’ अशीच ही हृदयद्रावक जीवाचा थरकाप उडवणारी घटना घडली.