पुणे – पुण्यामध्ये आगीचे सत्र सुरुच आहे. आज देखील पुण्यातील केशव व्यंकटेश चांफेकर क्रिडागृहात आग लागली. सकाळी साडे दहा वाजता ही आग लागली. याबाबत महाराष्ट्रीय मंडळाचे केशव व्यंकटेश चांफेकर क्रिडागृहात आग लागल्याची वर्दी मिळाली. यानंतर अग्निशमन मुख्यालयातून एक फायरगाडी व एक वॉटर टँकर तसेच गंगाधाम अग्निशमन केंद्र येथील एक अग्निशमन वाहन रवाना करण्यात आले. अग्नीशमन दलाच्या गाड्या तातडीने घटनास्थळी दाखल झाल्या.
घटनास्थळीच जाताच अग्नीशमन जवानांना दिसले की, घटनास्थळी केशव व्यंकटेश चांफेकर क्रिडागृहात खेळाचे साहित्य ठेवलेल्या ठिकाणी आग लागली होती. तसेच आसपासच्या परिसरामध्ये धुरांचे लोट मोठ्या प्रमाणात पसरले होते. अग्नीशमन दलाने त्याचवेळी तातडीने आगीवर पाण्याचा मारा सुरू करत आग नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न केला. सुमारे १५ मिनिटांत संपुर्ण आग विझवण्यात आली.
क्रिडागृहात ही आग लागली असल्यामुळे तिथे खेळासाठी आलेले खेळाडू व शिक्षक यांच्याशी संवाद साधत सर्वजण सुरक्षित असल्याची खात्री करण्यात आली. तसेच यावेळी उपस्थित खेळाडू, विद्यार्थी-विद्यार्थीनी यांनी अग्निशमन दलाच्या जवानांची कर्तव्य तत्परता व कामकाज पाहून त्यांच्या या कामगिरी बद्दल त्यांचे आभार मानले. या आगीमध्ये खेळासाठी असणारे साहित्य जसे की, गाद्या, फोम, इलेक्ट्रिक वायर, संगणक, सीसीटीव्ही व कार्यालयातील इतर वस्तूंचे मोठे नुकसान झाले. तिथेच असणारे जिमनास्टिकचे साहित्य देखील जळाले होते. आग इलेक्ट्रिक शॉर्टसर्किटमुळे लागल्याची शक्यता वर्तवली जात आहे. सुदैवाने या घटनेमध्ये कोणतीही जिवीतहानी झालेली नसून काही जखमी देखील झालेले नाही.
या कामगिरीत अग्निशमन दलाचे सहाय्यक विभागीय अग्निशमन अधिकारी रमेश गांगड, स्टेशन ड्युटी ऑफिसर सुनिल नाईकनवरे व वाहनचालक हनुमंत कोळी, शुभम करांडे, निलेश कदम तसेच जवान विनायक माळी, जितेंद्र कुंभार, अतुल खोपडे, आशिष लहाने, दत्तात्रय वाबळे, गणेश मोरे, हेमंत शिंदे, सुरेश सुर्यवंशी, आदित्य परदेशी, अनिकेत खेडेकर, साईनाथ पवार, महेश घटमळ यांनी सहभाग घेतला.