जालना : राज्यामध्ये जालना आणि बीडमधील कायदा व सुव्यवस्थेबाबत प्रश्न निर्माण केला जात आहे. बीडमधील संतोष देशमुख हत्या प्रकरण ताजे असताना आता इतर अत्याचाराची प्रकरणं देखील समोर येत आहेत. यामध्ये भाजपचे आमदार सुरेश धस यांच्या अडचणींमध्ये वाढ झाली आहे. सुरेश धस यांचा कार्यकर्ता असलेला सतीश भोसले याचे कारनामे समोर येत आहे. पैशांची उधळण करत असलेले व्हिडिओ समोर आल्यानंतर आता तो वन्यप्राण्यांची शिकार करत असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. यानंतर आता वनविभागाने व पोलिसांनी सतीश भोसले याच्या घरी धाड टाकली आहे.
बीडच्या शिरूर तालुक्यातील बावी या गावातील डोंगर परिसरामध्ये मोठा हरणांचा कळप होता. मात्र या वन्यजीवांची शिकार करुन कळपाला संपवण्याचे काम सतीश उर्फ खोक्या भोसले करत असल्याचा आरोप करण्यात आला. बावी गावातील ढाकणे यांच्या शेतीलगत असलेला डोंगर, या डोंगरांमध्ये हरीण पाणी पिण्यासाठी आणि चारा खाण्यासाठी येत होते. मात्र, त्याच हरणांना पकडण्यासाठी त्यांची शिकार करण्यासाठी सतीश भोसले आणि त्याची गँग जाळी लावत होती. या गँगला ही जाळी लावू नका म्हणून मज्जाव केल्यानंतर तशी सूचना करणाऱ्यांनाच मारहाण करण्यात आली होती. ही बाब समोर आल्यानंतर पोलिसांनी आणि वनविभागाने सतीश भोसले याच्या घरी धाड टाकली आहे.
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
आमदार सुरेश धस यांचा कार्यकर्ता असलेल्या सतीश भोसले याच्या घरी पोलिसांचा मोठा फौजफाटा दाखल झाला आहे. तसेच वनविभागाचे अधिकारी देखील दाखल झाले आहेत. खोक्याच्या घरी वन्यजीवांच्या शिकारीचे घबाड सापडले आहे. धारदार शस्त्र, जाळी, वाघूरसह आणि अनेक गोष्टी वनविभागाला आढळून आल्या आहेत. प्राण्यांचे मांस देखील पोलिसांना आढळले आहे. जिल्हा वन अधिकारी अमोल गरकळ याच्या मार्गदर्शनाखाली 40 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी ही धाड टाकली होती. वन विभागाच्या पथकाने घटनास्थळी पंचनामा करून हरणांचे शिंग जप्त केले असून, त्याचा पुढील तपासासाठी फॉरेन्सिक लॅबकडे पाठवण्यात आला आहे.
महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
कोण आहे सतीश भोसले?
बीड हत्या प्रकरण ताजे असताना याबाबत भाजप आमदार सुरेश धस याने आक्रमक पवित्रा घेतला होता. मात्र आता सुरेश धस यांच्या कार्यकर्त्याने जालनामध्ये तळपत्या सळईचे चटके हे पीडित तरुणाला दिले. याचा व्हिडिओ समोर आल्यानंतर सतीश भोसले याची अनेक प्रकरणे समोर आली. यानंतर अंजली दमानिया यांनी देखील त्याचे पैशांसोबतचे व्हिडिओ शेअर केले. तसेच सतीश भोसले याच्याकडे भाजपच्या महाराष्ट्र भटके विमुक्त आघाडीचे पद आहे. यामाध्यमातून तो राजकारणामध्ये देखील सक्रीय आहे. तसेच तो सुरेश धस यांचा कार्यकर्ता म्हणून देखील काम करत होता. आता तो वादाच्या भोवऱ्यामध्ये अडकला आहे.