मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आंदोलनामध्ये दंगली घडवण्याचा प्रयत्न असल्याचा आरोप केला आहे (फोटो - सोशल मीडिया)
जालना : राज्यामध्ये सध्या कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे. बीडमधील अनेक धक्कादायक अत्याचाराच्या घटना समोर येत आहेत. बीडमधील मस्साजोग गावाचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येचे प्रकरण ताजे असताना अनेक घटनांच्या व्हिडिओ व्हायरल होत आहेत. यामध्ये भाजप आमदार सुरेश धस यांचा कार्यकर्ता सतीश भोसले आणि कैलास बोराडे हे वादाच्या भोवऱ्यामध्ये अडकले आहेत. या दोघांवर कारवाई करण्याची मागणी करण्यात येत आहे. या संदर्भात मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी बीड आणि जालनामध्ये होत असलेल्या अत्याचारांच्या घटनांवर प्रतिक्रिया दिली आहे. जरांगे पाटील म्हणाले की, हा व्हिडीओ कुठला आहे, हा पोलिसांनी तपास करून शोधायला हवं,ज्या जिल्ह्यातील हा व्हिडिओ आहे तेथील SP वर संशय निर्माण होईल असे वागू नये,याचे उत्तर पालकमंत्र्यांनी द्यावे अशी मागणी कैलास बोराडे याच्या व्हायरल व्हिडीओ संदर्भात जरांगे पाटील यांनी केली आहे.
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
पुढे ते म्हणाले की, “या अत्याराच्या समोर आलेल्या व्हिडिओ संदर्भात कारवाई केली का+? पालकमंत्र्यांनी याची काही माहिती घेतली का? धर्म,देव आणि महापुरुष यापलीकडे गढूळ व्यक्तींना जातीवादाचं वेड लागले आहे. सरकारकडून पडताळणी झाल्यावर मी नाव घेईल. प्रशासनाची खात्रीशीर अधिकृत माहिती आल्यावर सांगेल. तोच व्यक्ती प्रामाणिकपणे सांगेल. महादेव भक्त स्वतः कबूल करतो. माहिती समोर न आल्यास पालकमंत्री अडचणीत येणार. पालकमंत्री यांनी पडताळणीवर दबाव आणला असे म्हणता येईल. जिल्ह्याचा पालकमंत्री या फेऱ्यात येईल,” असा घणाघात मनोज जरांगे पाटील यांनी केला आहे.
पुढे त्यांनी आरक्षणाच्या मुद्द्यांवर पुन्हा एकदा प्रकाश टाकला आहे. जरांगे पाटील म्हणाले की, “मराठा आरक्षणाबाबत अधिवेशन झाल्यावर आपण शांत बसणार नाही. सर्वांना प्रमाणपत्र देण्यात यावेत. शिंदे समिती काम करीत नाही. उपोषण सोडताना गुन्हे मागे घेऊन म्हणाले होते. मात्र गु्न्हे काही मागे घेतलेले नाही. सरकारने मराठा आरक्षणाचा मुद्दा मार्गी काढावा. वारंवार सांगत आहोत आमदारांनी मराठा आरक्षणाचा मुद्दा अधिवेशनात उपस्थित करून कुणबी प्रमाणपत्र लागू करावे. कोणत्याही पक्षाचे असो मराठा आमदारांनी हा मुद्दा लावून धरावा,” अशी मागणी मनोज जरांगे पाटील यांनी केली आहे.
महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
मराठा आरक्षणाच्या सुरुवातीपासून मनोज जरांगे पाटील आणि ओबीसी नेते छगन भुजबळ यांच्यामध्ये खडाजंगी झाली आहे. जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा भुजबळांवर निशाणा साधला आहे. ते म्हणाले की, “छगन भुजबळ हा सडलेल्या डोक्याचा आहे. यांच्या डोक्यात फक्त जातीभेद आहे. सगळ्यांनी मिळून चुकणाऱ्यांचे कान मारायचे. गुन्हे करणारा तो आपला बाब्या असे सुरु आहे. छगन भुजबळ यांचे जातीवादीचे स्वप्न कधी पूर्ण होणार नाही. स्वप्न बघून मरशील पण स्वप्न पूर्ण होणार नाही. छगन भुजबळ सारख्या जातीय लोकांनी वाद घडवून आणले आणि आता किनाऱ्यावर बसून ते पाहत बसले आहेत,” अशी गंभीर शब्दांत मनोज जरांगे पाटील यांनी टीका केली आहे.