पैसे देणार नाही, मात्र तुझे घर दुरुस्त करून देईन ! माजी जि.प अध्यक्ष निकम यांची पीडित कवर कुटूंबाला ग्वाही
मोखाडा/ दीपक गायकवाड: मोखाडा तालुक्यातील जोगलवाडी येथील कवर कुटुंबाच्या दारिद्र्याला वारंवार आलेल्या संकटांनी आणखी एक काळी किनार दिली. मोडकळीस आलेल्या, चहूबाजूंनी गळक्या छपराखाली राहणाऱ्या या कुटुंबाच्या घरात अठरा विश्वे दारिद्र्याचीच गर्दी; त्यातच वेळेवर वैद्यकीय मदत न मिळाल्याने आयुष्यात येणारी उर्मीच गमावलेला नवजात अर्भक. या वेदनेचे पडसाद परिसरात उमटत असतानाच पालघर जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष प्रकाश निकम यांनी पीडित कुटुंबाची भेट घेऊन जखमेवर सांत्वनाचा हात ठेवला आणि,” तुला पैसे देणार नाही,मात्र तुझे घर दुरुस्त करून देईन.” अशी ग्वाही देत त्यांना नव्या आशेचा दिलासा दिला.
घटनेचा प्रारंभ ११ जूनच्या पहाटे झाला. अविता कवर यांना तीनच्या सुमारास प्रसूती वेदना सुरू झाल्या. 108 आणि 102 या दोन्ही शासकीय रुग्णवाहिका उपलब्ध न झाल्याने कुटुंबीयांनी घाबरगडबडीत खासगी वाहनाची व्यवस्था केली; अखेर दुपारी बाराला खोडाळा प्राथमिक आरोग्य केंद्र गाठले. परंतु तेथेही रुग्णवाहिका मिळण्यासाठी तब्बल दोन‑तीन तासांचा विलंब झाल्याने उपचारासाठी मोखाडा, तिथून नाशिक असा दीडशे‑किलोमीटरचा प्रवास अवितांना बाळासह करावा लागला. या खेपेत १५ तास खर्ची पडले आणि नियतीच्या क्रूर निर्णयाने नवजात बाळ जगाच्या प्रकाशापासून वंचित राहिले.
Mumbai Crime : रेल्वे स्टेशनवरून ३२४९ मोबाईल चोरी; पोलिसांसमोर तपासाचे आव्हान
दुर्दैव यावरच थांबले नाही. रुग्णालय प्रशासनाने मृत अर्भकाला आणि मातेचा परतीचा प्रवास सुलभ करण्यासाठी देखील रुग्णवाहिका उपलब्ध करून दिली नाही. परिणामी कुटुंबीयांना बसने तब्बल ८० किलोमीटर प्रवास करून गाव गाठावे लागले. या अमानुष दुर्लक्षामुळे संपूर्ण राज्यात संतापाची लाट उसळली; आरोग्य विभागाच्या निष्काळजी कारभारावर टिकेची झोड उठली.
याच पार्श्वभूमीवर माजी जि.प. अध्यक्ष प्रकाश निकम जोगलवाडीला पोचले. ओलाचिंब भिंती, चिकाटीने तग धरलेला कौलारू छपराचा सांगाडा आणि प्रत्येक पावसात घरात साचणारे पाणी—खरं तर घर म्हणण्यासही लाजेल अशी अवस्था त्यांच्या डोळ्यांसमोर उभी राहिली. शासनाच्या आपत्ती निधीवर किंवा लोकांकडून जमा रोख रकमेवर अवलंबून न राहता, “थेट निवारा सुदृढ केल्यासच या कुटुंबाला दीर्घकालीन फायदा होईल,” असा विचार करून त्यांनी घर दुरुस्तीचा संकल्प जाहीर केला.
Sindhudurg Accident : सिंधुदुर्गात भीषण अपघात! भरधाव बस आणि रिक्षाचा चक्काचूर; चौघांचा जागीच मृत्यू
निकम यांच्या निर्णयानंतर गावातून व सामाजिक संस्थांतून किराणा‑धान्य, वैद्यकीय मदत, शैक्षणिक साहित्य अशा स्वरूपात मदतीचा ओघ सुरू झाला आहे. मात्र निकम यांचा हा दृष्टिकोन ग्रामीण भागातील संकटग्रस्त कुटुंबांना दीर्घ शाश्वत आधार देणारा ठरत आहे.