File Photo : Fraud
जळगाव : एका रेल्वे कर्मचाऱ्याची तब्बल 10 लाख 74 हजारांची फसवणूक झाल्याची घटना समोर आली. त्या कर्मचाऱ्याला त्याच्या वडिलांचे नावे असलेली कागदपत्रे पाठवली. त्यानंतर पॉलिसीची रक्कम परत देण्याच्या नावाखाली ऑनलाईन फसवणूक करण्यात आली.
प्रसाद किशोर कुलकर्णी (वय ३६, रा. तुळशीनगर, भुसावळ) असे फसवणूक झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. प्रसाद कुलकर्णी हे रेल्वेत नोकरीला आहेत. 8 मार्च 2024 रोजी त्यांना भालचंद्र व रामचरण नाव सांगणाऱ्या दोन जणांनी मोबाईवर संपर्क साधला व वडिलांच्या नावे असलेली पॉलिसीची रक्कम परत देतो, असे सांगून त्यांनी काही कागदपत्रे पाठवली.
कुलकर्णी यांचा विश्वास संपादन करून त्यांच्याकडून वेगवेगळ्या पद्धतीने ऑनलाईन माध्यमातून तब्बल 10 लाख 74 हजार 194 स्वीकारले. पण पॉलिसीची रक्कम कोणत्याही पद्धतीने मिळाली नाही. आपली फसवणूक झाली हे लक्षात आल्यानंतर कुलकर्णी यांनी जळगाव सायबर पोलिसात धाव घेऊन तक्रार दिली.
त्यानुसार, भालचंद्र आणि रामचरण नाव सांगणारे अज्ञात दोन मोबाईलधारकांवर जळगाव सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास जळगाव सायबर पोलिस करत आहेत.






