File Photo : Gas Tanker
अकोला : जिल्ह्यातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५३ वर व्याळा गावाजवळ एक गॅस टँकर उलटल्याची दुर्घटना रविवारी दुपारी घडली. या अपघातात टँकर चालक गंभीर जखमी झाला आहे. गॅस टँकरचा अपघात झाल्यावर सुदैवाने त्यातून गॅस गळती झाली नसल्याने मोठा अनर्थ टळला. अन्यथा जयपूर येथील गॅस टँकरच्या भीषण अपघात प्रकरणाची पुनरावृत्ती अकोला जिल्ह्यात घडण्याची शक्यता नाकारता आली नसती. अपघातामुळे वाहतुकीचा खोळंबा झाला होता.
हेदेखील वाचा : ‘थर्टी फर्स्ट’च्या पार्श्वभूमीवर पोलिसांचा राहणार चोख बंदोबस्त; अमरावतीत 80 अधिकाऱ्यांसह 800 पोलिस असणार तैनात
राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५३ वर अकोल्यावरून बाळापूरकडे इंडियन कंपनीचा गॅस टँकर (क्र. एमएच ०४ जेके १८७८) जात होता. दरम्यान, महामार्गावरील व्याळा गावाजवळ चालकाचे नियंत्रण सुटल्याने टँकर रस्त्याच्या बाजूला उलटला. गॅस टँकरचा अपघात होताच परिसरात भीतीचे वातावरण पसरले. महामार्गावरून धावणाऱ्या इतर वाहन चालकांनी दूरच आपली वाहने रोखून धरली होती. त्यामुळे महामार्गावर दोन्ही बाजूला वाहनांच्या मोठ्या रांगा लागल्या होत्या. या अपघाताची माहिती मिळताच पोलिसांसह संबंधित कंपनीच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळावर धाव घेतली. या अपघातात चालक आलोक विरेंद्र सिंह गंभीर जखमी झाला असून, त्याला उपचारार्थ रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
जयपूरमध्ये 15 जणांचा झाला होता मृत्यू
राजस्थानातील जयपूर-अजमेर महामार्गावर २० डिसेंबर रोजी सकाळी एलपीजी गॅसने भरलेल्या एका टँकरने अन्य टँकर व ट्रकला धडक देऊन भीषण अपघात घडला होता. त्या अपघातात टँकरचा मोठा स्फोट झाला. त्यामुळे आजूबाजूची अन्य वाहने देखील आगीच्या भक्ष्यस्थानी सापडली होती. या भीषण अपघातात 15 पेक्षा अधिक नागरिकांचे प्राण गेले, तर अनेक जण जखमी झाले आहेत. जयपूर येथील अपघाताची ही घटना ताजी असतांनाच अकोला जिल्ह्यात महामार्गावर गॅस टँकर उलटला. चालकाची प्रकृती गंभीर असल्याची माहिती आहे. नशीब बलवत्तर म्हणून अपघातग्रस्त टँकरला आग लागली नाही. यामुळे मोठा अनर्थ टळला आहे.
मुंबईच्या घाटकोपर येथे अपघात
मुंबईच्या कुर्ला येथील बेस्ट बसच्या अपघाताची घटना ताजी असताना घाटकोपरमध्ये असाच एक भीषण अपघात घडला आहे. मुंबईमधील घाटकोपर येथे एक भरधाव वेगाने धावणाऱ्या टेम्पोने अनेक जणांना धडक दिल्याचे समजते आहे. अत्यंत वेगाने असणाऱ्या या टेम्पोने 5 ते 6 जणांना चिरडले असल्याची माहिती समोर येत आहे. तसेच या भीषण अपघातामध्ये एका महिलेचा मृत्यू झाल्याचे समजते आहे.
हेदेखील वाचा : ‘राजगुरूनगर, लोणावळ्यात घडलेल्या घटना भयंकर’; रुपाली चाकणकर यांनी दिल्या ‘या’ महत्त्वाच्या सूचना